Coldest Inhabited Place on Earth: सध्या जगातील बहुतांश भागांमध्ये (Winter) हिवाळा ऋतू सुरू असून भारतातील मनाली आणि काश्मीरसह उत्तराखंडसारख्या राज्यांमध्ये अनेक भागांवर बर्फाची चादर पाहायला मिळतेय. अगदी परदेशातही काही देशांमध्ये थंडीचा कडाका वाढला असून, बर्फवृष्टीला सुरुवात झाली आहे. काही भागांमध्ये तर हिमवादळंसुद्धा आली आहेत. इथं ही मोसमी थंडी सोसनाशी होत असतानाच जगाच्या पाठीवर काही अशीही ठिकाणं आहेत, जिथं जवळपास वर्षभर बर्फाचीच चादर असते. माहितीये का अशा एखाद्या ठिकाणाचं नाव?
हे असं ठिकाण आहे, जिथं पेनातील शाईपासून अगदी डोळ्याच्या पापण्यांवर जमा होणारं पाणीसुद्धा बर्फात रुपांतरित होत आहे. कारण ठरतंय ते म्हणजे इथं सातत्यानं घटणारं तापमान. उणे 50 अंश इतक्या तापमानात नेमकी काय अवस्था होत असेल? हाच प्रश्न मनात घर करत असेल तर, त्याचं प्रात्यक्षिक पाहायला मिळतं ते म्हणजे रशियातील ओम्याकॉन हे गाव.
जिथं भारतात अती थंडी किंवा अती पाऊस पडला किंवा अगदी हवा अधिक प्रदृषित झाली तरीही शाळांना सुट्टी दिली जाते, तिथंच ओम्याकॉन या शहरवजा गावात तापमान उणे 52 अंशांवर पोहोचलं तरीही शाळांना मात्र सुट्टी नसते. इथं विद्यार्थी उबदार कपड्यांचे एकावर एक दोन ते तीन थर घालून, बर्फातून वाट काढतही शाळेत येतात. तिथं अभ्यास करतात, शाळेमध्येच त्यांच्या न्याहारीचीसुद्धा सोय केली जाते.
निसर्गानं कितीही मारा केला तरीही इथं असणाऱ्या स्थानिकांमध्ये शिक्षणाविषयी कमालीची जागरुकता असून, स्थानिक शाळांमधील शिक्षणासह येथील युवा वर्ग मुख्य प्रवाहातील शहरांमध्येही जाऊन उच्च शिक्षण घेण्याला प्राधान्य देतात. इथं पडणारी थंडी अनेकांसाठी आव्हानात्मक वाटत असली तरीही स्थानिकांसाठी मात्र ही थंडी त्यांच्या दैनंदिन जीवनाचाच एक भाग आहे.
अवघ्या 500 लोकसंख्येच्या या गावात स्थानिकांचं राहणीमान पूर्णपणे वेगळं असून, त्यांचा आहारही बहुतांशी मांस आणि माशांवर अवलंबून आहे. विविध प्रकारचं मांस आणि भाज्या वापरुन तयार करण्यात आलेलं सूप, घोडा किंवा रेनडियरचं मांस इथं प्रामुख्यानं खाल्लं जातं. इथं मांस, मासे आणि अन्य पदार्थ उघड्यावर ठेवले जातात. जेणेकरून ते दीर्घकाळ टीकू शकतील. ओम्याकॉनमध्ये जेवण बनवण्यासाठी पारंपरिक चुलींचा वापर केला जातो. किंवा हिटरच्या सहाय्यानं घर उबदार ठेवण्यासोबतच त्याच्या मदतीनं अन्नपदार्थसुद्धा शिजवले जातात.
ओम्याकॉनमध्ये सर्वाधिक निच्चांकी तापमान उणे 72 अंशांपर्यंतही पोहोचलं असून, येथील गारठा आणि स्थानिकांचं त्याच्याशी एकरुप होणं हा मुद्दा अभ्यासकांनाही थक्क करणारा आहे. इथं उन्हाळा हा ऋतूही अस्तित्वात असून, उन्हाळ्याचं तापमान असतं उणे 10 अंश सेल्सिअस. जाणूनच दातखिळी बसतेय ना? विचार करा, स्थानिकांना या वातावरणाशी दोन हात करताना कशी आव्हानं येत असतील...