Shaktipeeth Expressway News In Marathi: महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ म्हणजेच (MERDC) ने नागपुर -गोवा शक्तीपीठ एक्सप्रेसवे तयार करणार आहे. शक्तीपीठ महामार्गासाठी मराठवाड्यातील काही जिल्ह्यात भूसंपादन प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. 12 जिल्ह्यातून शक्तीपीठ महामार्ग जाणार आहे. यामुळं कनेक्टिव्हीटी वाढणार असून पर्यटन तर वाढेलच पण त्याचबरोबर देवस्थानांचे पर्यटन विकासालाही चालना मिळणार आहे. तसंच, या महामार्गामुळं 18-20 तासांचा प्रवास 8-10 तासांवर येणार आहे.
शक्तीपीठ महामार्ग वर्धा जिल्ह्यातील पवनार येथून सुरू होणार असून महाराष्ट्र-गोवाच्या सीमेवरील पत्रादेवी येथे संपतो. वर्धा, यवतमाळ, हिंगोली, नांदेड, परभणी आणि सिंधुदुर्ग सह 12 जिल्ह्यातून हा मार्ग जाणार आहे. जलद आणि अधिक सुविधा असलेल्या या मार्गामुळं प्रवासांचा प्रवास सोप्पा होण्यास मदत मिळणार आहे.
शक्तीपीठ महामार्गाचे प्रमुख उद्दिष्ट्य हे तीर्थस्थळांना जोडणं हे आहे. वर्धा ते सिंधुदुर्ग जिल्ह्यापर्यंत असलेल्या महामार्गामुळं भाविकांना आणि पर्यटकांना प्रवास करणे अधिक सुकर होणार आहे. ज्यामुळं देवस्थानांच्या पर्यटनाला चालना मिळणार असून या क्षेत्राचा आर्थिक विकासदेखील होणार आहे.
नागपूर-गोवा महामार्गाचे नाव शक्तीपीठ ठेवण्यात आले आहे कारण हा महामार्ग राज्यातील तीन देवींच्या शक्तीपीठांना जोडतो. शक्तीपीठ महामार्गाने कोल्हापूरची करवीर निवासिनी अंबाबाई, महाराष्ट्राची कुळस्वामिनी तुळजापूरची तुळजाभवानी, नांदेडमधील माहूरची रेणुकादेवी ही तीन शक्तीपीठे जोडली जाणार आहेत. यासोबतच परळी वैजनाथ आणि औंढा नागनाथ या दोन ज्योतिर्लिंग तीर्थक्षेत्रांनाही हा शक्तीपीठ माहामार्ग जोडला जाणार आहे.
नागपूर – वर्धा असा ८० किमीचा समृद्धी महामार्गाचा भाग आहे. त्यामुळे शक्तीपीठ वर्धा येथून सुरू होणार असून हा मार्ग वर्धा, यवतमाळ, हिंगोली, नांदेड, परभणी, बीड, लातुर, धाराशीव, सोलापूर, सांगली, कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग या १२ जिल्ह्यातून जाणार आहे. या प्रकल्पाचा खर्च 86,000 कोटी इतका येण्याची शक्यता आहे.
नागपूर-मुंबई समृद्धी एक्स्प्रेस वे 701 किमी लांबीचा आहे. तर, शक्तीपीठ एक्स्प्रेसवे एकूण 802 किलोमिटरचा हा प्रस्तावित रस्ता आहे. यासाठी 27 हजार एकर जमीन संपादित केली जाणार आहे. भारतातील सर्वाधीक लांबीचा महामार्गाच्या यादीत समाविष्ट होणार आहे.