बायकोबरोबरच्या सेल्फीमुळे खात्मा... 2 आमदारांची हत्या, 1 कोटींचं बक्षीस अन् जंगलात रात्रभर गोळीबार

Who Was Chalapati: मागील तीन दशकांपासून सुरक्षा यंत्रणा या माणसाला शोधत होता. त्याच्याबद्दलची बरीच माहिती यंत्रणांकडे होती पण त्यांना कोणतेही ठोस यश मिळत नव्हते. अखेर तो दिवस उडाला सोमवारी!

स्वप्निल घंगाळे | Updated: Jan 22, 2025, 11:23 AM IST
बायकोबरोबरच्या सेल्फीमुळे खात्मा... 2 आमदारांची हत्या, 1 कोटींचं बक्षीस अन् जंगलात रात्रभर गोळीबार title=
सुरक्षायंत्रणांना मोठं यश (जवानांचा फोटो प्रातिनिधिक आहे)

Who Was Chalapati: ओडिशाच्या सीमेजवळ छत्तीसगढच्या गरिआबंद जिल्ह्यातील व्याघ्र प्रकल्पाच्या परिसरामध्ये सोमवारी रात्री झालेल्या मोठ्या चकमकीमध्ये सुरक्षा यंत्रणांना मोठं यश मिळालं आहे. या चकमकीमध्ये कुप्रसिद्ध नक्षवलवादी चलपती उर्फ प्रताप रेड्डी रामचंद्र रेड्डीचा खात्मा करण्यात सुरक्षा यंत्रणांना यशस्वी ठरल्यात. वेगवेगळ्या राज्यांमधील यंत्रणांना दशकभराहून अधिक काळापासून चकवा देणाऱ्या 62 वर्षीय चलपती हा मागील अनेक काळापासून मोठ्या गुन्ह्यांमध्ये मोस्ट वॉण्टेड होता. चलपतीने अनेक हाय-प्रोफाइल हल्ले घडवून आणले होते. एक आमदाराच्या हत्येचे प्रकरणातही  त्याच्यावर 1 कोटींचं बक्षीस जाहीर करण्यात आलं होतं. पत्नीबरोबरच्या एका सेल्फीमुळे हा 1 कोटींचं बक्षीस असलेल्या नक्षलवाद्याला संपवण्यात यश आलं आहे. 

..अन् तो नक्षलवादाकडे वळला

सीपीआय (मार्क्सवादी लेनिनवादी) च्या पीपल्स वॉर ग्रुप (PWG) च्या विचारधारेबद्दल अगदी लहानपणापासून आत्मियता असलेला चलपतीने इंटरमिडीयटपर्यंतच्या शिक्षणानंतर शैक्षणिक वाटचाल थांबवली आणि तो या संघटनेत सहभागी झाला. चलपतीने श्रीकाकुलम येथे जाऊन पीडब्लूजीमध्ये सहभागी होत प्रशिक्षण घेण्यास सुरुवात केली. चलपतीने श्रीकाकुलमच्या उद्दानम भागात काम केलं.  चलपतीला सीपीआय पक्षाच्या सदस्य पदावरुन थेट विभागीय समिती सदस्य म्हणजेच डीसीएम बनवण्यात आलं. चलपती हा नक्षलवाद्यांमध्ये रेड्डी, प्रताप, रवी, जयराम अनेक नावांनी ओळखला जायचं, असं स्पेशल इंटेलिजन्स ब्युरोच्या (SIB) नोंदी सांगतात. भारत सरकारची ही संघटना नक्षलवाद्यांची गुप्त माहिती गोळा करण्याचं काम करते.

दोन आमदारांची गोळ्या झाडून हत्या

रेड्डी हा मूळचा आंध्र प्रदेशातील चित्तूर जिल्ह्यातील मातेमपैपल्ली (Matempaipally) गावचा होता. चलपती हा 23 सप्टेंबर 2018 रोजी अराकूच्या डंब्रिगुडा भागात नक्षलवाद्यांनी केलेल्या हल्ल्याचा मास्टरमाईंड होता, असं सुरक्षा यंत्रणांचा दावा होता. या भीषण नक्षली हल्ल्यात अराकू व्हॅलीतील टीडीपी पक्षाचे आमदार किदारी सर्वेश्वर राव (Kidari Sarveswara Rao) यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. तसेच राव यांच्याच पक्षाचे माजी आमदार सिवेरी सोमा (Siveri Soma) यांची या हल्ल्यात गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. दोन नेत्याची हत्या करणाऱ्या नक्षलवाद्यांच्या टोळीचं नेतृत्व चलपती आणि त्याची पत्नी अरुणाने केल्याचा ठपका ठेवण्यात आला होता.

गनीमी कावा एक्सपर्ट

चलपतीकडे गनीमी कावा पद्धतीचे युद्ध कौशल्य आणि त्यासंदर्भातील रणनीती आखण्याचे विशेष ज्ञान होते. याच्या जोरावरच काही वर्षांमध्ये संघटनेमध्ये मोठी पदं मिळवली होती. हाय प्रोफाईल हल्ल्यांबरोबरच नवीन दहशतवाद्यांच्या भरतीसाठी संघटना सध्या चलपतीवरच अवलंबून होती. आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि छत्तीसगडच्या सीमावर्ती भागांमधील अनेक मोठ्या नक्षली हल्ल्यांची योजना आखून त्यांचे नेतृत्व केल्याचा आरोप चलपतीवर होता. तो मागील तीन दशकांपासून सक्रीय होता. चलपतीला मागील काही काळापासून गुडघेदुखीचा त्रास जाणवत होता आणि त्याने आंध्र-ओडिशा सीमेवर अनेक ठिकाणी गुपचूप उपचार घेतले होते, अशी माहितीही सुत्रांनी दिली आहे.

त्या सेल्फीमुळेच खात्मा झाल्याचा दुजोरा

तीन दशकं आपली दहशत निर्माण करणाऱ्या चलपतीची बरीच माहिती यंत्रणांकडे होती. मात्र काही केल्या त्याचा फोटो सापडत नव्हता. अखेर मे 2016 मध्ये तपास यंत्रणा जी गोष्ट मागील अनेक वर्षांपासून शोधत होते ती त्यांना सापडली. विशाखापट्टणममधील एका चकमकीत ठार झालेल्या नक्षलवादी नेत्याच्या लॅपटॉपवर चलपतीचा त्याची पत्नी अरुणाबरोबरचा सेल्फी सापडला. या फोटोमधून पहिल्यांदाच चलपती नेमका कसा दिसतो हे सुरक्षायंत्रणांना समजलं. आंध्रप्रदेश पोलिसांच्या माध्यमातून पहिल्यांदाच चलपतीचा चेहरा जगासमोर आला. याच फोटोचा फायदा सोमवारी झालेल्या चकमकीतही चलपती मारला गेल्याची ओळख पटवण्यासाठी झाला. केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांनाही चलपती आणि त्याचे सहकाऱ्यांचा खात्मा करण्यात आल्याच्या वृत्ताला आपल्या एक्स अकाऊंटवरुन दुजोरा दिला आहे.

प्रेमसंबंधांमुळे कारवाई

नक्षलवादी संघटनेमध्ये डेप्युटी कमांडर पदावर असलेल्या अरूणाबरोबर प्रेमसंबंध ठेवल्याचा ठपका ठेवत चलपतीवर 2010 साली एक वर्षाच्या निलंबनाची कारवाई करण्यात आली होती. पुढे काही वर्षांनी चलपती आणि अरूणाने लग्न केले. चलपतीकडे सध्या संघटनेनं ओडिशामधील राज्य समितीचा सचिवपदाचा कारभार सोपवला होता. चलपतीच्या डोक्यावर एक कोटी रुपयांचे बक्षीस होते.