कोरोनाचं संकट वाढल्यामुळे मंत्र्याची आत्महत्या

कोरोना व्हायरसने जगभरात थैमान घातलं आहे.

Updated: Mar 29, 2020, 07:53 PM IST
कोरोनाचं संकट वाढल्यामुळे मंत्र्याची आत्महत्या title=

फ्रॅन्कफर्ट : कोरोना व्हायरसने जगभरात थैमान घातलं आहे. कोरोनाचं हे संकट आणखी वाढल्यामुळे जर्मनीच्या हेस्सी राज्याचे अर्थमंत्री थॉमस शेफर यांनी आत्महत्या केली आहे. कोरोना व्हायरसमुळे झालेलं आर्थिक नुकसान भरून कसं काढायचं? या चिंतेत थॉमस शेफर होते, असं हेस्सी राज्याचे प्रमुख व्होल्कर बोफियर यांनी सांगितलं आहे.

५४ वर्षांच्या थॉमस शेफर यांचा मृतदेह रेल्वे रुळाशेजारी सापडला. थॉमस शेफर यांनी आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज वेसबदेनमधल्या स्थानिक पोलिसांनी वर्तवला आहे. 'थॉमस यांनी आत्महत्या केल्यामुळे आम्हाला धक्का बसला आहे. यावर आमचा विश्वासचं बसत नाही. थॉमस यांच्या मृत्यूचं आपला दु:ख झालं आहे,' अशी प्रतिक्रिया बोफियर यांनी दिली आहे.

हेस्सी प्रांतामध्ये जर्मनीची आर्थिक राजधानी असलेलं फ्रॅन्कफर्ट हे शहर येतं. फ्रॅन्कफर्ट या शहरात डच बँक, कॉमर्स बँक यांचं मुख्यालय आहे. युरोपियन सेन्ट्रल बँकही फ्रॅन्कफर्टमध्येच आहे.

थॉमस शेफर हे गेल्या १० वर्षांपासून हेस्सीचे अर्थमंत्री होते. 'कोरोना व्हायरसचा आर्थिक फटका बसल्यामुळे थॉमस कंपन्या आणि कर्मचाऱ्यांना मदत करण्यासाठी दिवस रात्र झटत होते. या आर्थिक परिस्थितीमुळे शेफर बरेच चिंतेत होते, असंच म्हणावं लागेल. या कठीण काळामध्येच आम्हाला शेफर यांची जास्त गरज होती', अशी प्रतिक्रिया बोफियर यांनी दिली.

जर्मनीच्या हेस्सी प्रांतात लोकप्रिय असणारे थॉमस शेफर यांना व्होल्कर बोफियर यांचे उत्तराधिकारी मानलं जायचं. शेफर हे जर्मनीच्या पंतप्रधान एंजला मर्कल आणि व्होल्कर बोफियर यांच्याच सीडीयू पक्षाचे होते. थॉमस शेफर यांना पत्नी आणि दोन अपत्य आहेत.