मुंबई : चीनमध्ये उदयास आलेला हा कोरोना व्हायरस त्या ठिकाणी शमल्याचं दृश्य होतं. परंतु या धोकादायक विषाणूने चीममध्ये पुन्हा डोकंवर काढलं आहे. गेल्या २४ तासांमध्ये या ठिकाणी नवीन ९९ कोरोना रुग्ण आढळले आहेत. शिवाय शनिवारी ६३ जण असे देखील समोर आले आहेत ज्यांमध्ये कोरोनाची लक्षणं नाहीत, असं चीनच्या आरोग्य अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आलं आहे. त्यामुळे आता चीनमध्ये कोरोना रुग्णांची संख्या ८२ हजार ०५२ वर पोहोचली आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी चीनमधील लॉकडाऊन शिथिल करण्यात आला होता.
लॉकडाऊन दरम्यान अनेक चिनी नागरिक दुसऱ्या देशांमध्ये अडकले होते. त्यामुळे हे अडकलेले नागरिक पुन्हा चीनमध्ये परतल्यानंतर कोरोनाग्रस्त रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. सध्या त्यांना १४ दिवसांसाठी आयसोलेशन केंद्रात दाखल करण्यात आले आहे. एनएचसीच्या म्हणण्यानुसार ३ हजार ३३९ जणांचा कोरोना व्हायरसने बळी घेतला आहे.
शनिवारपर्यंत चीनमध्ये कोरोनाग्रस्तांची संख्या ८२ हजार ०५२ वर पोहोचली आहे. यामध्ये सध्या १ हजार १३८ लोकांवर उपचार सुरू आहेत. तर दिलासादाक बातमी म्हणजे ७७ हजार ५७५ रुग्ण बरे होवून सुखरूप घरी परतले आहेत. तर दुसरीकडे पुन्हा फैलावत असलेल्या कोरोनामुळे चीनच्या राष्ट्रीय आरोग्य आयोगाने चिंता व्यक्त केली आहे.
संपूर्ण जगभरात आतापर्यंत १,६७६,२६५ हून अधिक कोरोना रुग्ण आढळले आहेत. त्यापैकी १०३,६६० लोकांचा मृत्यू झाला आहे. जगभरातील २०.८ टक्के रुग्ण पूर्णपणे बरे झाले आहेत. ३ लाखांहून अधिक जण कोरोनामुक्त झाले आहेत.