Fake Astronaut : प्रेमाच्या (Love) आणाभाका एखाद्या व्यकीचं आयुष्य पूर्णपणे बदलतात. पण, एका महिलेला मात्र याच आणाभकांचा फटका बसला आहे. कारण, तिची मोठी फसवणूक करण्यात आली आहे. मूळच्या जपानमधील (Japan) एका महिलेची आंतरराष्ट्रीय अंतराळ तळावर काम करणाऱ्या कथित रशियन अंतराळवीर असल्याचं सांगणाऱ्या व्यक्तीनं गंडा घातला आहे. 4.4 मिलियन येन (24.8 लाख रुपये) इतकी रक्कम तिच्याकडून लांबवण्यात आली आहे. प्रेमाच्या नादात अनेक वचनं देणाऱ्यांना तुम्ही पाहिलं असेल. पण, हा पठ्ठ्याही पुढचा निघाला. त्यानं मी पृथ्वीवर परततो आणि त्यानंतर लग्न करतो, अशा आशा 65 वर्षीय महिलेला दिल्या आणि तिच्याकडे पैशांची मागणी केली.
उपलब्ध माहितीनुसार शिगा प्रांतातील या महिलेची या फसव्या व्यक्तीशी जून महिन्यात इन्स्टाग्रामवर (instagram) ओळख झाली होती. त्याच्य प्रोफाईलवर अंतराळाचे बरेच फोटो होते असंही सांगण्यात आलं ज्यामुळं तो अवकाळ क्षेत्रात काम करतो असा महिलेचा समज झाला होता.
महिलेला लाखो रुपयांचा गंडा...
या प्रकरणामध्ये सुरुवातील महिला आणि तिची फसवणूक करणाऱ्या व्यक्तीमध्ये मॅसेजद्वारे बोलण्यास सुरवात झाली. लगेचच त्या व्यक्तीनं महिलेवरील प्रेमाची कबुली दिली. इतक्यावरच न थांबता त्यानं तिला लग्न करण्याचं वचनही दिलं. पृथ्वीवर परतल्यानंतर मी तुझ्याशी लग्न करेन, जपानमध्ये येऊन संसारस थाटेन अशा आशा दाखवल्या.
खरं वळण पुढे होतं, कारण पृथ्वीवर परतण्यासाठी आणि लग्न करण्यासाठी पैशांची गरज असल्याची मागणी त्यानं तिच्यासमोर ठेवली. जपानमध्ये रॉकेट लँड करण्यासाठीच्या Fee विषयी त्यानं महिलेला सांगितलं.
सदर व्यक्तीच्या बोलण्यावर विश्वास ठेवत महिलेनं त्याच्या प्रेमापोटी पैसे देण्याचा निर्णय घेतला. 19 ऑगस्ट ते 5 सप्टेंबरच्या दरम्यान एकूण 4.4 मिलियन येन इतकी रक्कम पाच भागांमध्ये त्याला दिली. पैशांची मागणी थांबतच नसल्याचं पाहून अखेर त्या महिलेला संशय आला आणि तिनं पोलिसांत याप्रकरणी तक्रार दाखल केली. सध्याच्या घडीला या प्रकरणाकडे पोलीस यंत्रणा International Romance Scam म्हणून पाहत आहे.