Google News : मोठमोठ्या संस्था आणि त्या संस्थांमधून कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या सुविधा पाहता नव्या पिढीला कायमच आपण अशा एखाद्या संस्थेसाठी काम करावं असं वाटतं. इथं पगाराचा मुद्दा केंद्रस्थानी असला तरीही नोकरीच्या ठिकाणी असणारं वातावरणही अनेकांसाठी तितकंच महत्त्वाचं असतं. कारण, आपण दिवसातील बरेच तास या नोकरीच्याच ठिकाणी व्यतीत करत असतो. अनेकांचंच Office शी एक खास नातंही तयार होतं. पण, काहींच्या नशीबात मात्र अशी वळणं येतात जिथं हीच कंपनी त्यांना एका क्षणात दुरावते.
नुकताच Google मध्ये काम करणाऱ्या एका महिलेला हा कटू अनुभव आला. Recruiting Manager म्हणून गुगलसाठी काम करणाऱ्या निकोल फोले नावाच्या महिलेला तिच्या प्रसूती रजेदरम्यानच नोकरीवरून काढण्याचं फर्मान देण्यात आलं. नोकरकपातीची तलवार तिच्यावर पडली आणि एका क्षणात सर्वकाही बेचिराख झाल्याच्याच भावनेनं तिच्या मनात घर केलं.
निकोलनं जवळपास 12 वर्षे 5 महिने आणि काही दिवसांचा काळ कंपनीसोबत काम केलं. पण, नोकरकपातीत तिचं नाव घेताना कंपनीनं मात्र ही बाब विचारातच आणली नाही. 10 आठवड्यांच्या बाळाची काळजी घेण्यासाठी रजेवर असणाऱ्या निकोलला कामावरून काढण्यासाठी त्यांनी मागंपुढं पाहिलं नाही. ज्यानंतर निकोलनं तिच्या मनातील भावना LinkedIn च्या माध्यमातून व्यक्त केल्या.
'गुगलमध्ये 12 वर्षे 5 महिन्यांचा काळ घावल्यानंतर मागच्या बुधवारी गुगलमध्ये झालेल्या नोकरकपातीच्या कात्रीत मी सापडले. किमान शब्दांत सांगावं तर मला हादराच बसला आहे, तेसुद्धा या 10 आठवड्यांच्या बाळासाठी सुट्टीवर असताना'. निकोलनं नोकरीवरून काढण्यात आल्याची खंत व्यक्त केली. पण, सोबतच कंपनीसोबत व्यतीत केलेल्या काळाबाबत कृतज्ञताही व्यक्त केली.
आता येत्या काळात आपल्यापुढं नेमकं काय वाढून ठेवलंय असं म्हणताना नव्या मुलाखती कशा द्यायच्या, नवी नोकरी कशी असेल या साऱ्यासाठी आपण उत्साही असल्याचंही तिनं या पोस्टमध्ये म्हटलं. एकिकडे नोकरी गेल्याची खंत आणि दुसरीकडे एका नव्या संधीची प्रतीक्षा अशा प्रचंड आशावादी दृष्टीकोन तिच्या पोस्टमधून पाहायला मिळाला.