लॉस एंजेलिस : अमेरिकेतील लॉस एंजेलिसमध्ये रस्त्यांवर मोठे-मोठे फ्रिज ठेवण्यात आले आहेत. त्या फ्रिजमध्ये दूध, फळं, भाज्या, चिकन आणि इतर काही सामान ठेवण्यात आलं आहे. या फ्रिजमधून ज्या व्यक्तीला जे काही गरजेचं हवं आहे ते तो घेऊ शकतो. ऐकायला हे नवलचं वाटतंय ना? पण हे खरं आहे. लॉस एंजेलिसमध्ये अशाप्रकारचे अनेक कम्युनिटी फ्रिज ठेवण्यात आले आहेत. कोरोना व्हायरसमुळे आर्थिक फटका बसलेल्या गरजू लोकांच्या मदतीसाठी हे कम्युनिटी फ्रिज ठेवण्यात आले आहेत.
या कम्युनिटी फ्रिजमधून हव्या त्या वस्तू घेण्यासाठी कोणतीही लाईन लावावी लागत नाही, की कोणताही फॉर्म भरावा लागत नाही. या फ्रिजला कोणतंही लॉक लावण्यात आलेलं नाही. हे फ्रिज 24 तास गरजूंच्या मदतीसाठी उपलब्ध असून कोणीही गरजू व्यक्ती यातून आवश्यक असलेल्या वस्तू घेऊ शकतं.
एका इंग्रजी वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार, लॉस एंजेलिस कम्युनिटी फ्रिजच्या आयोजक मॅरिना वर्गरा यांनी सांगितलं की, जर एखाद्याला फ्रिजमध्ये ठेवलेल्या संपूर्ण सामानाची गरज असेल, तर तो ते सर्व घेऊ शकतो. संपूर्ण सामान घेतल्याबद्दल त्याला कोणीही काही बोलू शकत नाही. एखाद्या व्यक्तीला गरजूंसाठी या फ्रिजमध्ये काही सामान ठेवायचं असेल, तर तेदेखील लोक यासाठी मदत करु शकतात.
वर्गरा यांनी सांगितलं की, लॉस एंजेलिसच्या रस्त्यांवर अशाप्रकारचे 7 फ्रिज लावण्यात आले असून त्यांना रचनात्मकरित्या रंग देण्यात आले आहेत. अधिकाधिक गरजू लोकांना मदत करणं, हा यामागचा उद्देश असल्याचं त्या म्हणाल्या. न्यूयॉर्कमध्ये ही कल्पना अंमलात आणण्यात आली होती. या फ्रिजमधून कोणीही, काहीही घेऊन जाऊ शकतं किंवा मदतीसाठी कोणत्याही वस्तू ठेवू शकतं.
लॉस एंजेलिसमध्ये आधीपासूनच बेघर लोकांची मोठी संख्या असून त्यात कोरोनामुळे लोकांना मोठा आर्थिक फटका बसत आहे. बेघरांसाठी काम करणार्या 'रीच फॉर दी टॉप' या संस्थेच्या सहकार्याने वर्गरा यांनी फ्रिजची कल्पना अंमलात आणली. वर्गरा यांना अशाप्रकारचे अनेक फ्रिज ठेवायचे आहेत. परंतु त्यांनी सांगितलं की, बर्याच समुदायांमध्ये असा विश्वास आहे की, यामुळे त्यांच्या स्वाभिमानाला ठेच पोहचू शकते. अनेकांना फुड बँकेत जाण्यासाठी लाज वाटते, त्याशिवाय स्थलांतरितांनी येथून निर्वासित होण्याची भीती देखील आहे, असंही त्या म्हणाल्या.