नवी दिल्ली : पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांची खुर्ची कधीही जाऊ शकते अशी चिन्हं आहेत. पाकिस्तानात इम्रान सरकारविरोधात प्रचंड असंतोष आहे. आधीच अस्वस्थ आणि निर्नायकी माजलेल्या पाकिस्तानात आता पंतप्रधान इम्रान खान यांची खुर्चीच डळमळीत झाली आहे. शनिवारी इम्रान खान यांना पाकिस्तानच्या संसदेत विश्वासदर्शक ठरावाला सामोरं जाण्याची वेळ आली. कारण पाकिस्तानचे अर्थमंत्री आणि इम्रान यांचे अत्यंत जवळचे समजले जाणारे अब्दुल हाफीज शेख यांचा सिनेट इलेक्शनमध्ये लाजिरवाणा पराभव झाला. पाकिस्तानचे माजी पंतप्रधान आणि युसूफ रजा गिलानी यांनी शेख यांना पराभूत केलं.
खुद्द पंतप्रधान इम्रान खान यांनी शेख यांचा प्रचार केला होता. त्यामुळे इम्रान खान यांना हा मोठा धक्का समजला जातो आहे. आणखी धक्कादायक म्हणजे गिलानी यांचा अवघ्या पाच मतांनी विजय झाला. पाकिस्तानातल्या मीडिया रिपोर्टसनुसार या सिनेट निवडणुकीत तीन मतं बाद झाली त्यामध्ये पंतप्रधान इम्रान खान आणि दोन मंत्र्यांच्या मतांचा समावेष होता.
गेल्या काही काळापासून पाकिस्तानात इम्रान सरकारविरोधात प्रचंड असंतोष आहे. बलुचिस्तान, सिंध वेगळं होण्याची मागणी करत आहेत. इम्रान खान यांच्याविरोधात पाकिस्तानातले सगळे पक्ष एकवटलेत. अर्थमंत्री अब्दुल हाफीज शेख यांच्या पराभवामुळे इम्रान खान यांची खुर्ची डळमळीत झालीय. विरोधकांनी इम्रान यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. आता इम्रान खतरे में की खुर्ची में, याचा फैसला शनिवार करणार आहे.