वैमानिकाला सुखरुप परत पाठवा, भारताची पाकिस्तानकडे मागणी

ताब्यात घेतलेल्या वैमानिकाला परत करा, अशी मागणी भारताने पाकिस्तानकडे केली आहे.

PTI | Updated: Feb 27, 2019, 08:18 PM IST
वैमानिकाला सुखरुप परत पाठवा, भारताची पाकिस्तानकडे मागणी title=

नवी दिल्ली : ताब्यात घेतलेल्या वैमानिकाला परत करा, अशी मागणी भारताने पाकिस्तानकडे केलीय. परराष्ट्र मंत्रालयाने पाकिस्तानचे भारतातील उप-उच्चायुक्त सय्यद हैदर शाह यांना समन्स बजावले होते. यावेळी वैमानिकाला ताब्यात घेतल्याबद्दल भारताने तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली. अशाप्रकारे वैमानिकाला ताब्यात घेऊन पाकिस्तानने जिनिव्हा कराराचे उल्लंघन केला असल्याचेही भारताने म्हटले आहे. वैमानिकाचा अमानुष व्हिडिओ दाखवल्याचाही यावेळी कठोर शब्दांत निषेध व्यक्त करण्यात आला आहे. वैमानिकाला कुठलीही इजा होता कामा नये, असे भारताने पाकिस्तानला खडसावले आहे. पाकिस्तानला प्रत्युत्तर देताना भारताने पाकिस्तानचे एक विमान पाडले, तर एक विमान गमावले आहे. एका भारतीय वैमानिकाला पकडल्याचा दावा पाकिस्तानने केला आहे.

पाकिस्तानच्या दाव्याची भारत सरकार खातरजमा करत आहे. दरम्यान, पाकिस्तानच्या ताब्यात असलेल्या भारतीय हवाई दलातील पायलटला तत्काळ आणि सुखरूपपणे भारताच्या हवाली करण्यात यावे, अशा स्पष्ट शब्दांत भारताने पाकिस्तानला बजावले आहे. पाकिस्तानने जिनिव्हा कराराचे उल्लंघन केल्याचे भारताने म्हटले आहे. दरम्यान, पाकिस्तानचे भारतातील उप उच्चायुक्त सय्यद हैदर शाह यांना परराष्ट्र मंत्रालयाने आज सायंकाळी बोलावून घेतले. यावेळी पाकिस्तानने केलेल्या हवाई हल्ल्याच्या प्रयत्नांवर भारताने आपला तीव्र आक्षेप नोंदवला. परराष्ट्र मंत्रालयाने एक निवेदन जारी केले आहे. त्यात पाकिस्तानच्या ताब्यात असलेल्या भारतीय वैमानिकाला कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही, याची हमी पाकिस्तानने द्यायला हवी, अशी ठाम मागणी करण्यात आली आहे. 

भारतीय पायलटचा जखमी अवस्थेतील फोटो पाकिस्तानकडून जारी करण्यात आला आहे. यावर भारताने तीव्र आक्षेप घेतला आहे. हे सरळसरळ आंतरराष्ट्रीय मानवतावादी कायद्याचे आणि जिनेव्हा परिषदेतील ठरावाचे उल्लंघन आहे, असे भारताने म्हटले आहे.