Indian Student Death : अमेरिकेत भारतीयांच्या मृत्यूचे सत्र कायम असल्याचे पाहायला मिळत आहे. गेल्या दोन महिन्यात अमेरिकेत अनेक भारतीय विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणांचे गांभीर्य पाहून अमेरिकेतल्या सरकारने देखील चिंता व्यक्त केली आहे. गेल्या महिन्यात आणखी एका भारतीय विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली होती. एका विद्यापीठाच्या आवारात या विद्यार्थ्याचा मृतदेह सापडला होता. आता विद्यार्थ्याचा मृत्यूबाबत धक्कादायक माहिती समोर आली आहे.
अकुल धवन असे मृत विद्यार्थ्याचे नाव आहे. 20 जानेवारी रोजी अमेरिकेतील इलिनॉय युनिव्हर्सिटी अर्बाना-चॅम्पेनमध्ये भारतीय विद्यार्थी अकुल धवनचा मृतदेह सापडला होता. त्यानंतर त्याच्या मृत्यूबाबत चौकशी सुरु करण्यात आली होती. अखेर त्याच्या मृत्यूचे कारण समोर आलं आहे. थंडीमुळे अकुलचा मृत्यू झाल्याची माहिती सरकारी अधिकाऱ्यांनी दिली.
नेमकं काय घडलं?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 19 जानेवारी रोजी रात्री 11:30 वाजता मित्रांसोबत दारू पिण्यासाठी बाहेर पडला होता. रात्री उशिरा अकुल कॅम्पसजवळील कॅनोपी क्लबमध्ये गेला. यादरम्यान त्याच्या मित्रांना क्लबमध्ये प्रवेश मिळाला. मात्र क्लबच्या कर्मचाऱ्यांनी अकुलला एंट्री देण्यास नकार दिला. तो वारंवार क्लबमध्ये जाण्याचा प्रयत्न करत होता. मात्र त्याला रोखण्यात आलं. त्यानंतर त्याचे मित्र क्लबमध्ये निघून गेले आणि तो बाहेरच राहिला.
मात्र त्यानंतर अकुल बराच वेळ सापडला नाही आणि त्याचा फोनही लागत नव्हता. त्यामुळे त्याच्या मित्रांनी कॅम्पस पोलिसांना कळवले आणि त्याला शोधण्यास सांगितले. पोलिसांनी संपूर्ण कॅम्पसमध्ये शोध घेतला, मात्र अकुलचा पत्ता लागला नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी विद्यापीठाच्या एका कर्मचाऱ्याला इमारतीच्या मागे एक मृतदेह दिसला. त्यानंतर त्याने पोलीस आणि वैद्यकीय विभागाला माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळ गाठले असता हा मृतदेह अकुल धवनचा असल्याचे आढळून आले.
कशामुळे झाला मृत्यू?
इलिनॉय आणि आसपासच्या भागात जानेवारी महिन्यात प्रचंड थंडी पडते. या भागातील तापमान उणे 20 ते 30 अंश सेल्सिअसपर्यंत जाते. अशा परिस्थितीत, जर कोणी जास्त वेळ बाहेर राहिला तर त्याचा हायपोथर्मियामुळे मृत्यू होऊ शकतो. शरीराच्या तापमानात अचानक घट झाल्यामुळे हायपोथर्मिया होतो. अकुलच्या मृत्यूच्या रात्री तिथे तापमान -2.7 अंश सेल्सिअस होते. त्याला क्लबमध्ये एन्ट्री न मिळाल्याने तो बाहेरच थांबवला होता. अकुलच्या मृत्यूचे कारण अति मद्यपान आणि हाडांना गोठवणारी थंडी असल्याचे पोलिसांनी सांगितले.