भारताच्या कूटनितीचा विजय, इस्लामिक कॉर्पोरेशन परिषदेने पाकला तोंडावर पाडलं

पाकिस्तानचा विरोध डावलून सुषमा स्वराज यांचं जोरदार स्वागत

Updated: Mar 1, 2019, 01:39 PM IST
भारताच्या कूटनितीचा विजय, इस्लामिक कॉर्पोरेशन परिषदेने पाकला तोंडावर पाडलं title=

अबुधाबी : भारत-पाकिस्‍तानमध्ये तणाव कायम असताना पाकिस्‍तानच्या परराष्ट्र मंत्र्यांनी संयुक्‍त अरब अमिरात (UAE) मध्ये होत असलेल्या  इस्लामिक कॉर्पोरेशनच्या परिषदेत भाग घेण्यास नकार दिला आहे. पाकिस्‍तानने या परिषदेत भारताला आमंत्रित केल्याचा विरोध दर्शवला आहे. पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री शाह महमूद कुरैशी यांनी म्हटलं की, 'पाकिस्तान अबूधाबीमध्ये होत असलेल्या ओआयसी बैठकीला जाणार नाही. याआधी त्यांनी म्हटलं होतं की, 'पाकिस्तान ओआयसीचा संस्थापक सदस्य देश आहे. हा आमचा फोरम आहे. आम्ही या बैठकीत सहभागी होऊ आणि पाकिस्तानची बाजू मांडू.' भारत ओआयसीचा सदस्य नाही आहे. त्यांना पहिल्यांदा आमंत्रण देण्यात आलं आहे. पण मी उद्घाटन कार्यक्रमात सुषमा स्वराज यांच्यासोबत बसणार नाही.' पण आता त्यांनी जाणारच नसल्याचं म्हटलं आहे.

पुलवामा हल्ल्यानंतर भारताने बालाकोटमध्ये एअर स्‍ट्राईक केला. भारत पाकिस्‍तानवर सतत दबाव वाढवत आहे. जगभरातून पाकिस्तानवर दबाव वाढवण्यासाठी भारत प्रय़त्न करत आहे. त्यातच यूएईने भारताला प्रमुख उपस्थितीसाठी आमंत्रण दिल्याने पाकिस्तानचा तिळपापड झाला आहे. पाकिस्तानचा विरोध डावलून भारताला आमंत्रण देण्यात आलं. हा भारताचा मोठा विजय मानला जात आहे. सुषमा स्वराज या प्रमुख अतिथी आहेत. संयुक्त अरब अमिरात (UAE)चे परराष्ट्र मंत्रीी शेख अब्दुल्ला बिन जायद अल नाहयान यांनी सुषमा स्वराज यांना य परिषदेसाठी आमंत्रित केलं आहे.

परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज ऑर्गनायझेशन ऑफ इस्लामिक कॉर्पोरेशनच्या परिषदेसाठी यूएईला दाखल झाल्या आहेत. अबू धाबी एअरपोर्टवर त्यांचं जोरदार स्वागत करण्यात आलं. ऑर्गनायझेशन ऑफ इस्लामिक कॉर्पोरेशनमध्ये ५७ देशांचा सहभाग आहे. परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज दोन दिवस संमेलनात सहभागी होणार आहेत. दहशतवादाच्या मुद्द्यावर पाकिस्तानला घेरण्यासाठी आणि पाकिस्तानचा खरा चेहरा जगासमोर आणण्यासाठी या परिषदेचा वापर करू शकतो. याच कारणामुळेच पाकिस्तान या बैठकीत सुषमा स्वराज यांना बोलावण्यास विरोध करत होता. सुषमा स्वराज या बैठकीत सहभागी झाल्या तर आम्ही परिषदेत सहभागी होणार नाही असं पाकिस्तानने म्हटलं होतं. मात्र पाकिस्तानच्या या धमकीचा ओआयसीवर काहीही परिणाम झाला नाही. ज्यामुळे पाकिस्तान पुन्हा एकदा तोंडावर पडला आहे.