आपल्या अध्यात्मिक गुरुशीच लग्न करणार 'ही' राजकुमारी! राजवाडा, संपत्ती सोडणार? सर्वसामान्यांप्रमाणे जगणार

Wedding News : प्रेम श्रीमंती पाहत नाही; सर्वसामान्य अध्यात्मिक गुरुवर जडला राजकुमारीचा जीव, लवकरत अडकणार लग्नाच्या बेडीत. पाहा कोण आहे तिचा होणारा पती...   

सायली पाटील | Updated: Sep 14, 2023, 03:51 PM IST
आपल्या अध्यात्मिक गुरुशीच लग्न करणार 'ही' राजकुमारी! राजवाडा, संपत्ती सोडणार? सर्वसामान्यांप्रमाणे जगणार title=
Martha Louise Marriage with shaman durek see photos

Wedding News : प्रेम... एक अशी भावना ज्याची परिभाषा अनेकांनाच मांडता आलेली नाही. काहींना मात्र ही परिभाषा इतक्या सुरेख पद्धतींनी मांडता आली की संपूर्ण जगानंच या मंडळींना डोक्यावर उचलून घेतलं. मुळात प्रेम ही भावनाच अशी आहे जी प्रत्येकाला वेगळा अनुभव देते. उगाच नाही म्हणत, 'एकदातरी प्रेमात पडावं'. कारण हेच प्रेम अनेकदा पडत्या काळात आधार होतं, आनंदाचं कारण ठरतं, यशामागच्या श्रेयाचं खरं हक्कदार असतं. अशाच प्रेमाच्या नात्याची एक लक्षवेधी गोष्ट नुकतीच जगासमोर आली आहे. 

ती राजकुमारी आणि तो... 

सध्या जगासमोर प्रेमाचं एक असं नातं आलं आहे जे पाहता अनेकजण आश्चर्यचकित झाले आहेत. श्रीमंती, आलिशान जीवनशैली आणि अनेक सोयीसुविधांमध्ये सहजतेनं आयुष्य जगणाऱ्या एका राजकुमारीनं तिच्या प्रेमापोटी एक मोठा निर्णय घेतला आहे. या नात्यात तिनं श्रीमंती, पैसाअडका काहीही पाहिलेलं नाही. कारण, ही राजकुमारी एका सर्वसामान्य अध्यात्मिक गुरुच्या प्रेमात पडली आहे.

इथं ज्यांच्या प्रेमाच्या नात्याची चर्चा होत आहे ती आहे नॉर्वेची राजकुमारी मार्था लुई आणि तिचा प्रियकर स्वयंघोषित अध्यात्मिक गुरु शमन ड्युरेक वेरेट. अनेक महिन्यांच्या प्रेमानंतर मार्थानं वयाच्या 51 व्या वर्षी शमनशी लग्न करण्याचा निर्णय घेतला आहे. 

हेसुद्धा वाचा : पंचतारांकित हॉटेलसारख्या सुविधा; 'या' जेल इतक्या आलीशान की बेरोजगार म्हणतील मला अटक करा!

 

मार्था ही, राजा हराल्ड आणि राणी शोंजा यांची थोरली मुलगी आहे. पण, मार्था आणि शमन ड्युरेक वेरेट यांच्या या लग्नाच्या नात्यावर नॉर्वेतील नागरिकांकडून फारशी सकारात्मक प्रतिक्रिया मिळत नसल्याचं पाहायला मिळत आहे. वेरेट इथं त्याच्या वादग्रस्त वक्तव्य आणि उपचारांसाठी ओळखला जातो. त्यामुळं नॉर्वेमध्ये त्याला नीम हकीम म्हणूनही ओळखलं जातं. 

लग्नाचं ठिकाणही ठरलं... 

नागरिकांकडून होणारा विरोध झुगारून राजकुमारी मार्थानं अध्यात्मिक गुरुसोबतच्या नात्याला एक नवं नाव देण्याचा निर्णय घेतला आहे. या दोघांचा विवाहसोहळा नॉर्वेतील गिरनाजेर या किनारपट्टी शहरात पार पडणार आहे. हे एक जागतिक वारसाप्राप्त स्थळ असून, मार्थाच्या मते लग्नासाठी ती या ठिकाणाला सुरेख पद्धतीनं सजवून घेणार आहे. कुतूहलाची बाब म्हणजे मार्थाचे वडील राजा हेराल्ड यांनीही 1968 मध्ये शोंजा नावाच्या एका सर्वसामान्य महिलेशी लग्न करण्याचा निर्णय घेतला होता. ज्यानंतर आता त्यांची मुलगीही त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवताना दिसत आहे. राजा हेराल्ड आणि राणी शोंजा या दोघांनीही आपल्या मुलीच्या या निर्णयाचं स्वागत केलं असून, तिला भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. आता लग्नानंतर पतीप्रमाणं राजकुमारी मार्था सामान्य आयुष्य जगणार का हे पाहणं औत्सुक्याचं असेल.