इम्रान खान यांना अटक होण्याची शक्यता! थेट पाकिस्तानी निवडणूक आयोगाने जारी केलं अटक वॉरंट

इम्रान खान यांच्याबरोबरच त्यांच्या दोन सहकाऱ्यांविरोधातही अटक वॉरंट जारी करण्यात आलं आहे

Updated: Jan 11, 2023, 09:14 AM IST
इम्रान खान यांना अटक होण्याची शक्यता! थेट पाकिस्तानी निवडणूक आयोगाने जारी केलं अटक वॉरंट title=
pakistan election commission issues arrest warrants for Imran Khan aides in contempt case

पाकिस्तानचे माजी पंतप्रधान आणि पाकिस्तान तहरीक-ए-इंन्साफ (पीटीआय) चे नेते इम्रान खान यांच्या अडचणींमध्ये वाढ होण्याची शक्यता दिसत आहे. पाकिस्तानमधील निवडणूक आयोगाने (ईसीपी) मंगळवारी इम्रान खान आणि त्यांच्या पक्षातील फवाद चौधरी तसेच असद उमर यांच्याविरोधात आयोगाच्या आदेशाचं उल्लंघन केल्याप्रकरणी आणि अवमान केल्याच्या आरोपाखाली जामीनपात्र अटक वॉरंट जारी केलं आहे.

'पीटीआय' या वृत्तसंस्थेनं दिलेल्या माहितीनुसार इम्रान खान यांनी ऑगस्ट २०२२ मध्ये इस्लामाबादमधील एका रॅलीदरम्यान एका महिला न्यायाधिशाविरोधात वादग्रस्त विधान केलं होतं. तसेच या भाषणामध्ये इम्रान खान यांनी महत्त्वाचे पोलीस अधिकारी, निवडणूक आयोग आणि आपल्या राजकीय विरोधकांवरही टीका केली होती. पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांनी अतिरिक्त जिल्हा तसेच सत्र न्यायाधीश जेबा चौधरींविरोधात वादग्रस्त विधान केलं होतं. 

या भाषणानंतर काही तासांमध्ये इम्रान यांच्याविरोधात पोलिस आणि न्यायव्यवस्थेमधील व्यक्तींना धमकावल्या प्रकरणी दहशतवाद विरोधी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. आता निसार दुर्रानी यांच्या अध्यक्षतेखालील निवडणूक आयोगाच्या चार सदस्यीय खंडपीठाने खान आणि त्यांच्या निकटवर्तीयांविरोधात वॉरंट जारी केलं आहे. या वॉरंटबरोबरच प्रत्येकाला ५० हजार रुपये दंड जमा करण्याचेही आदेश देण्यात आले आहेत.

निवडणूक आयोगाच्या या निर्णयानंतर पीटीआयचे नेते असद उमर यांनी ट्विटरवरुन निवडणूक आयोगावर टीका केली आहे. असद उमर यांनी, "निवडणूक आयोगाने इम्रान खान, फवार चौधरी आणि माझ्याविरोधात अटक वॉरंट जारी केलं आहे. निवडणुका घेण्याऐवजी आयोग सध्या या कामांमध्ये व्यस्त आहे. आयोगानेच न्यायालयाचा अवमान केला आहे," असं म्हटलं आहे. निवडणूक आयोगाचा हा निर्णय उच्च न्यायालयाच्या निर्णयाचा अपमान करणार असल्याचा दावाही उमर यांनी केला आहे.

इम्रान खान यांनी अनेकदा पाकिस्तानी निवडणूक आयोगाच्या मुख्य आयुक्तांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. आयुक्तांनी निष्पक्षपणे आपली भूमिका बजावली नाही असा आरोप इम्रान यांनी अनेकदा केला आहे.