इस्लामाबाद: गंभीर आर्थिक संकटात सापडलेल्या पाकिस्तानची परिस्थिती दिवसेंदिवस खालावताना दिसत आहे. परिस्थिती इतकी बिकट झाली आहे की, पंतप्रधान इम्रान खान यांना रोटी आणि नान यांच्या किंमती करण्यासाठी कॅबिनेटची बैठक बोलवावी लागली. या बैठकीत त्यांनी रोटी व नान या जीवनावश्यक खाद्यपदार्थांचे दर तातडीने कमी करावे, असे आदेश दिले.
आर्थिक संकटामुळे गेल्या काही दिवसांमध्ये पाकिस्तानमध्ये पीठ आणि गॅसचे दर वाढवण्यात आले होते. त्यामुळे रोटी आणि नानच्या किंमतीमध्ये वाढ झाली होती. सध्या पाकिस्तानमध्ये एका नानसाठी १२ ते १५ रुपये तर रोटीसाठी १० ते १२ रुपये मोजावे लागत आहेत.
या पार्श्वभूमीवर मंगळवारी इम्रान खान यांनी मंत्रिमंडळाची बैठक घेतली. यावेळी त्यांनी रस्त्यालगत रोटी व नानसाठी तंदूर लावणाऱ्या खाद्यपदार्थ विक्रेत्यांसाठीचे गॅसचे दर कमी करण्याचा निर्णय घेतला. तसेच रोटी व नानचे दर तातडीने कमी करावेत, असेही बजावले. या निर्णयामुळे पाकिस्तानमधील सामान्य जनतेला मोठा दिलासा मिळाला आहे.
परकीय चलनाचा तुटवडा आणि आर्थिक संकट यामुळे पाकिस्तान मोठ्या संकटात सापडला आहे. काही दिवसांपूर्वीच आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने पाकिस्तानला ६ अब्ज डॉलर्सचे कर्ज देण्यास सहमती दर्शविली होती.
या आर्थिक संकटाच्या पार्श्वभूमीवर सरकारकडून कठोर सुधारणा अवलंबिण्यात आल्या आहेत. त्यामुळे पेट्रोल, गॅस आणि अन्य जीवनावश्यक वस्तुंचे दर मोठ्याप्रमाणावर वाढले आहेत. यामुळे सामान्य लोकांना समस्यांचा सामना करावा लागत आहे.