नवी दिल्ली : रशिया - युक्रेन युद्धावर राजनैतिक कॉरिडॉरमधून मोठी बातमी येत आहेत. युक्रेन संकटावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतीच रशियाच्या राष्ट्राध्यक्षांशी दीर्घ चर्चा केली. युक्रेनच्या संकटावर दोन्ही राष्ट्रप्रमुखांमधील हे दुसरे संभाषण आहे. पंतप्रधान मोदींनी राष्ट्राध्यक्ष पुतिन यांच्याशी 50 मिनिटांची चर्चा केली.
पीएम मोदींनी राष्ट्राध्यक्ष पुतिन यांना राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांच्याशी थेट चर्चा करण्याचे आवाहन केले आहे. राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी युक्रेनमधील सुमी शहरातून भारतीय नागरिकांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले आहे.
तत्पूर्वी, पंतप्रधान मोदींनी युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांच्याशी चर्चा केली. उच्च सरकारी सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, रुसो-युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सकाळी युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांच्याशी दीर्घ चर्चा केली. सकाळी 11.30 च्या सुमारास दोन्ही नेत्यांमध्ये 35 मिनिटे चर्चा झाली.
पीएम मोदी आणि राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी युक्रेनमध्ये उद्भवलेल्या युद्धाच्या परिस्थितीवर चर्चा केली आणि त्याच्या विविध आयामांचा विचार केला. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पंतप्रधान मोदींनी रशिया आणि युक्रेनमध्ये सुरू असलेल्या थेट चर्चेचे कौतुक केले. युक्रेनमधून भारतीय नागरिकांना बाहेर काढण्यासाठी युक्रेन सरकारने दिलेल्या मदतीबद्दल पंतप्रधान मोदींनी राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचे आभार मानले. सुमीमधून भारतीय नागरिकांना बाहेर काढण्यासाठी पंतप्रधान मोदींनी युक्रेन सरकारचे सहकार्य मागितले.
युक्रेनच्या सुमी शहरात अडकलेल्या आपल्या नागरिकांना बाहेर काढण्यासाठी भारताकडून चिंता व्यक्त केली गेली. दरम्यान, राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी कीव, सुमी, खार्किव आणि मारियुपोलमध्ये युद्धविराम जाहीर केला आहे.
काही दिवसांपूर्वी पंतप्रधान मोदींनी रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांच्याशी चर्चा केली होती. पंतप्रधान मोदींनी युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांच्याशीही चर्चा केली. आज युद्धाचा 12 वा दिवस आहे.
चार शहरांमध्ये युद्धविराम घोषित
दरम्यान, युद्धक्षेत्रातून आणखी एक मोठी बातमी समोर आली आहे. रशियाचे अध्यक्ष पुतिन आणि पंतप्रधान मोदी यांच्या चर्चेदरम्यान रशियाने चार भागात युद्धबंदी जाहीर केली आहे. यामुळे युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांनाही दिलासा मिळणार असून त्यांना युद्धक्षेत्रातून लवकर बाहेर काढता येणार आहे. विशेष म्हणजे युक्रेनच्या ज्या चार भागात रशियाने युद्धविराम घोषित केला आहे त्यात राजधानी कीव तसेच मारियुपोल, खार्किव आणि सुमी यांचा समावेश आहे.
सुमी हे एकमेव शहर आहे जिथे 700 वैद्यकीय विद्यार्थी अडकले आहेत. या भागाला युद्धाचा सर्वाधिक फटका बसला आहे. येथे अनेक विद्यार्थी बंकरमध्ये अडकले आहेत. आतापर्यंत एवढा गोळीबार झाला होता की विद्यार्थ्यांना येथून बाहेर पडण्याची संधी मिळत नव्हती. आता युद्धबंदीच्या घोषणेसह भारत सरकारने येथे अडकलेल्या विद्यार्थ्यांना बाहेर काढण्यास सुरुवात केली आहे.