युक्रेन : रशिया आणि युक्रेन यांच्यातील संघर्ष थांबण्याचं नाव घेत नाही. वेगवेगळ्या पद्धतीनं युद्ध सुरूच आहे. या युद्धामुळे जगाची चिंता वाढली आहे. कोरोनाशी लढता लढता जगात तिसऱ्या युद्धाची स्थिती निर्माण होईल असं कोणालाही वाटलं नव्हतं. युक्रेनमध्ये नागरिक जीवाचं रान करून आपला देश वाचवण्यासाठी लढत आहेत.
दारूगोळा आणि शस्त्रास्त्र सोडून आता युक्रेनच्या नागरिकांनी नवी योजना आखली आहे. घरातील वस्तूंचा वापर करून युद्ध लढण्याचा प्रयत्न करत आहेत. आता नागरिक घरातील भाजीचा वापरही युद्ध लढण्यासाठी करत आहेत.
युक्रेनची राजधानी कीव्हमध्ये राहणाऱ्या एलेनाने रशियाच्या ड्रोनवर टोमॅटो हल्ला केला. रशियाच्या सैनिकांना घरातील सामना, भाज्या आणि वस्तूंचा उपयोग करून अद्दल घडवण्याचा निश्चय युक्रेनच्या नागरिकांनी केला आहे.
एलेनाच्या धाडसाचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे. रशियाच्या सैनिकांना तिने टॉमेटो हल्ला करून धडा शिकवल्याची चर्चा आहे. मिळालेल्या माहितीनुसार एलेना आपल्या घराच्या बाल्कनीत सिगरेटचा आनंद घेत होती. त्यावेळी तिला रशियाचं ड्रोन दिसलं. तिने तातडीनं स्वयंपाकघरातून टोमॅटो आणून त्यावर हल्ला केला.
एलेनानं ड्रोनवर टोमॅटो फेकले. रशियाने पहिल्यांदा युक्रेनवर 24 फेब्रुवारीला हल्ला केला होता. त्यानंतर वेगवेगळ्या ठिकाणी रशियाच्या सैनिकांचा हल्ला सुरूच आहे. एलेनाच्या धाडसाचं आणि तिने वापरलेल्या युक्तीचं खूप कौतुक होत आहे.