Russian Ministry On Iphone: अमेरिकन मल्टीमिलियन कंपनी अॅपल (Apple) पुढील महिन्यात म्हणजेच सप्टेंबरमध्ये आयफोन 15 सिरीज लाँच करणार आहे. त्याआधी आता कंपनीला मोठा फटका बसला आहे. आयफोन ( Iphone) टेक्नोलॉजीच्या दुनियेत नवी क्रांती करत असतानाच आता आयफोनला रशियाकडून (Russian Ministry) मोठा धक्का बसला आहे. रशियाच्या डिजिटल डेव्हलपमेंट मंत्रालयाने सरकारी कर्मचाऱ्यांच्या आयफोन वापरावर बंदी घातली आहे. रशियाचे मंत्री मकसूत शाडेव यांनी शुक्रवारी याची माहिती दिली. त्याचं कारण देखील आता समोर आलंय.
रॉयटर्सनेने दिलेल्या माहितीनुसार, रशियन विकास मंत्रालयाचे मकसूत शादाएव यांनी एका डिजिटल कॉन्फरन्समध्ये पत्रकारांना उत्तरं दिली. त्यावेळी त्यांनी स्पष्टीकरण दिलं. अधिकृत ईमेल एक्सचेंजसाठी अॅपल स्मार्टफोन आणि टॅब्लेटच्या वापरावर बंदी घालण्यात आली आहे. मात्र, कर्मचारी वैयक्तिक कामासाठी आयफोन वापरू शकतात, असंही मकसूत शादाएव यांनी सांगतलं आहे.
रशियन मेन डोमेस्टिक सिक्युरिटी सर्व्हिस म्हणजेच FSB ने एक दावा केला होता. त्यानंतर संपूर्ण रशियामध्ये खळबळ उडाली होती. यूएस नॅशनल सिक्युरिटी एजन्सीने अॅपलच्या हजारो उत्पादनांचा हेरगिरीसाठी वापर जात असल्याचा दावा केला होता. त्यावर अॅपलने दावे फेटाळून लावले होते. या प्रकरणानंतर दोन महिन्यांनी आता रशियाच्या डिजिटल विकास मंत्रालयाने अशी बंदी जारी केली आहे. ऍपलने एफएसबीच्या सर्व आरोपांवर भाष्य करण्यास नकार दिला आहे. त्यामुळे आता येत्या काळात वाद पेटल्याचं दिसून येऊ शकतं.
'आपल्या भेटीचं आणखी एक ठिकाण,' रशियाने चंद्रावर Luna-25 पाठवल्यानंतर ISRO चं भन्नाट ट्वीट
दरम्यान, गेल्या अनेक महिन्यांपासून रशियाकडून अॅपलवर संशय व्यक्त करण्यात येत होता. रशियन सरकारने अॅपलवर अमेरिकन गुप्तचर संस्थेशी जवळून काम केल्याचा आरोप केला आहे. तेव्हापासून अॅपल कंपनीवर बॅन लागणार असल्याच्या चर्चा सुरू होत्या. मार्च महिन्यात देखील रशियन सरकारने आपल्या सरकारी कर्मचाऱ्यांना आयफोनच्या वापराबाबत सूचना जारी केल्या होत्या. अमेरिका हॅकिंग करत आहे, असा आरोप देखील त्यावेळी करण्यात आला होता.