latest Offers : असंच कधी सोशल मीडियावर स्क्रोल करताना तुम्हाला काही पोस्ट दिसतात आणि मग तुम्ही याच पोस्टवर ताटकळता. वारंवार तो फोटो किंवा तो व्हिडीओ पाहता. बऱ्याचदा ही पोस्ट असते एखाद्या अशा ठिकाणाची जिथलं सौंदर्य पाहून, इतक्या सुंदर वातावरणात आणि निसर्गाच्या कुशीत मला घर हवं... अशीच इच्छा तुमच्या मनात येते.
अहो मानवी स्वभावच आहे हा. स्वत:चं एक छानसं घर असावं, जिथं पाऊस ठेवताच आनंदानं हसावं... ही प्रत्येकाची इच्छा असते. असं हक्काचं आणि मनाजोगं घर उभं करण्यासाठी अनेकांनाच कैक वर्ष लागतात, आर्थिक उलाढाली कराव्या लागतात. पण, जेव्हा हे स्वप्न साकार होतं तेव्हा मिळणारा आनंद काही औरच.
तुम्हाला जर कुणी सांगितलं की अमुक एका ठिकाणी तुम्हाला फुकटात घर मिळेल... तर? विश्वास बसणार नाही, पण हे खरंय. जगभरात काही असे देश आहेत जिथं जाऊन तुम्ही स्थायिक झाल्यास तिथं एकही रुपया खर्च न करता तुम्हाला घर मिळतं. गाडी आणि सरकारी अनुदानही मिळतं. चला पहुया ही कमाल Offer देणारे देश कोणते...
अमेरिका (America)
अमेरिकेतील अलास्का पट्ट्यामध्ये राहण्यासाठी शासनाकडून आर्थिक अनुदान दिलं जातं. अती बर्फवृष्टीमुळं इथं वास्तव्यास असणाऱ्यांची संख्या तुलनेनं कमी आहे. पण, इथं जे कोणी राहतं त्यांना शासनाकडून दरवर्षी भारतीय परिमाणानुसार 1.5 लाख रुपये मिळतात. तुम्ही एक वर्ष इथं रहावं इतकीच काय ती अट.
स्पेन (Spain)
स्पेनमधील Ponga गावात लोकसंख्या वाढवत तेथील अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी स्थानिक प्रशासनाकडून इथं वास्तव्यास असणाऱ्यांना 1.5 लाख रुपये दिले जातात. इथं राहत असणाता बाळाचा जन्म झाल्यास त्या बाळाला 2 लाख रुपये दिले जातात.
ग्रीक आयलंड (Greece)
ग्रीक आयलंड Antikythera वर कोणी तीन वर्षांपर्यंत राहिल्यास त्यांना दर महिन्याला सरकारकडून 50 हजार रुपये दिले जातात. आश्चर्याची बाब म्हणजे इथं सध्या अवघी 50 लोकंच राहतात.
इटली (Italy)
इटलीतील Presicce मध्ये राहण्यासाठी सरकारकडून तब्बल 25 लाख रुपये दिले जातात. या ठिकाणी असणाऱ्या लोकसंख्येमख्ये वृद्धांची संख्या जास्त असल्यामुळं इथं लोकसंख्यावाढ होत नाहीये. त्यामुळं इथं राहणाऱ्यांसाठी शासन इतकी रक्कम मोजत आहे.
स्वित्झर्लंड (Switzerland)
जगातील सर्वात सुंदर देशांपैकी एक असणाऱ्या स्वित्झर्लंडमधील Albinen या गावात राहण्यासाठीसुद्धा शासनाकडून पैसे दिले जातात. जर, 45 हून कमी वयाचे लोक इथं येऊन राहतात तर, त्यांना शासनाकडून 20 लाख रुपये दिले जातात. तर, जोडप्यांना इथं 40 लाख रुपये दिले जातात. त्यात लहान मुलं असल्यास त्यांना 8 लाख रुपयांची तरतूद शासनातर्फे केली जाते. अट एकच... पुढील 10 वर्षे तुम्हाला ही जागा सोडता येणार नाही.