नवी दिल्ली: आंतरराष्ट्रीय स्तरावर सध्या मोठ्या घडामोडींना वेग आला आहे. अफगाणीस्तानमध्ये पंजशीरमध्ये तालिबान विरुद्ध तिथले नॉर्दन अलायन्स युद्ध सुरू आहे. तर दुसरीकडे अफगाणिस्तावर तालिबाननं कब्जा मिळवला आहे. आता पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनाही मोठा धक्का बसणार आहे. दुस-यासाठी खोदलेल्या खड्ड्यात कधी कधी खड्डा खोदणाराच पडतो. पाकिस्तानची अवस्था तशीच झाली आहे.
जे पेरतं तेच उगवतं, असं म्हणतात ते खोट नाही. पाकिस्ताननं हक्कानी नेटवर्कला तालिबानच्या विरोधात मोहरा म्हणून वापरलं. अफगाणिस्तानची सत्ता हक्कानीच्या हाती राहावी, असा पाकिस्तानचा खटाटोप होता. मात्र हक्कानी नेटवर्क पाकिस्तानसाठी बूमरँग ठरण्याची शक्यता आहे. कारण हक्कानी नेटवर्कची वक्रदृष्टी आता पाकिस्तानवरच पडली आहे.
पाकिस्तानातील वझिरीस्तान हा पश्तून बहुल भाग अफगाणिस्तानात सामील करून घेण्यासाठी हक्कानी नेटवर्क शर्थीचे प्रयत्न करत आहे. त्यामुळे पाकिस्तानचेच दोन तुकडे होण्याची वेळ आली आहे. डुरंड लाईन अफगाणिस्तान आणि पाकिस्तानी सीमांचं विभाजन करतं. मात्र डुरंड लाईनवरून पाकिस्तान आणि अफगाणिस्तानात वाद आहे.
डुरंड लाईन ओढून ब्रिटननं पश्तून लोकसंख्येचं विभाजन केल्याची पश्तून लोकांची भावना आहे. त्यामुळं तालिबान्यांनीही डुरंड लाइनला कायम विरोध केला. अमेरिकन सैन्याशी लढून अफगाणिस्तानची सत्ता तालिबान्यांना मिळू शकते, तर पाकिस्तानकडून वझिरीस्तान हिसकावून घेणं, फार मुश्कील नाही, अशी हक्कानी नेटवर्कची धारणा आहे. त्यामुळे पाकिस्तानातील इम्रान खान सरकारची झोप उडाली आहे.