Viral News : विमान प्रवासासाठी सहसा बोर्डिंगच्या तास दीड तास आधी विमानतळावर पोहोचण्याच्या सूचना असतात. हेच, जर परदेशातील प्रवास असेल तर विमानतळावर पोहोचण्याची वेळ अपेक्षेपेक्षा काहीशी जास्त असते. या साऱ्यामध्ये खरी गंमत तर, विमानात बसल्यानंतर येते. कारण, विमान रनवेवरून पुढे जाताना जेव्हा हवेत झेपावतं तेव्हा अनेकांच्याच पोटात गोळा येतो. प्रत्येक वेळी हा अनुभव अतिशय नवा असतो. अशाच प्रवासाच्या अपेक्षा ठेवत काही प्रवाशांनी 8 जानेवारीला प्रवास सुरु केला खरा. पण, त्यांना या प्रवासातून मनस्तापच जास्त झाला.
एअर कॅनडाच्या विमानातून प्रवास करण्यासाठी म्हणून बोर्डिग केलेल्या एका प्रवाशानं दुबईसाठी विमान टेक ऑफ करणार इतक्यातच विमानातून उडी मारली आणि एकच गोंधळ माजला. न्यूयॉर्क पोस्टनं यासंदर्भातील वृत्त प्रसिद्ध केलं. माध्यमांच्या माहितीनुसार या प्रवाशानं इतर प्रवाशांप्रमाणं बोर्डिंग प्रक्रिया पूर्ण केली, तो विमानातही आला. पण, आत बसण्याऐवजी त्यानं केबिनचं दार उघडलं आणि विमानातून थेट उडीच मारली.
तब्बल 20 फूटांवरून पडल्यामुळं या प्रवाशाला गंभीर दुखापत झाल्याची माहिती स्थानिक पोलिसांनी दिली. दरम्यान या घटनेनंतर तातडीनं आपत्कालिन सेवा पुरवणाऱ्या दलाला घटनास्थळी पाचरण करण्यात आलं. एअर कॅनडाच्या अधिकृत संकेतस्थळावरून देण्यात आलेल्या माहितीनुसार या संपूर्ण थररानाट्यामुळं बोईंग 747 विमानाचं उड्डाण तब्बल 6 तास उशिरानं झालं आणि इतर प्रवाशांना प्रचंड मनस्तापाचा सामना करावा लागला.