Corona Face Mask: कोरोना व्हायरस आणि त्यामुळे होणाऱ्या कोव्हीड-19 चा (Covid-19) संसर्गाचा फटका जगभरातील जवळजवळ सर्वच देशांना मागील तीन वर्षांमध्ये बसला आहे. कोरोनामुळे लाखो लोकांचा मृत्यू मागील तीन वर्षांच्या कालावधीमध्ये झाला आहे. कोरोना कालावधीमध्ये आणि अगदी आजही अनेक देशांमध्ये, शहरांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून मास्क घालून लोक फिरताना दिसतात. मास्क वापरल्याने कोरोनाचा संसर्ग रोखता येतो असं आरोग्यविषय संस्थांबरोबरच वेगवेगळ्या देशांमधील सरकारांनी आपल्या सूचनांमद्ये म्हटलं होतं. मात्र आता समोर आलेल्या पुराव्यांमध्ये असं कुठेही दिसून आलेलं नाही की मास्क वापरल्यामुळे करोनाचा संसर्ग रोखण्यामध्ये यश आलं आहे. सेंटर्स फॉर डिसीज कंट्रोल अॅण्ड प्रिव्हेंशनने (CDC) कोरोनाचा प्रादुर्भाव होण्यास सुरुवात झाली तेव्हा फेस मास्क लावणं गरजेचं नसल्याचं म्हटलं होतं. मात्र एप्रिल 2020 पर्यंत लोकांनी मास्क घालण्यास सुरुवात केली.
'फॉक्स न्यूज'ने दिलेल्या वृत्तानुसार सीडीसीचे निर्देशक डॉक्टर रॉबर्ट रेडफील्ड यांनी सप्टेंबर महिन्यामध्ये, फेस मास्क हे आपल्याकडे कोरोनाविरुद्ध लढण्यासाठीचं सर्वात सक्षम हत्यार असल्याचं म्हटलं होतं. त्यानंतर जगभरातील वेगवेगळ्या देशांनी लोकांना घराबाहेर पडताना मास्क घालणं बंधनकारक केलं.
मात्र आता जगभरातील नामांकित महाविद्यालयांमधील 12 संशोधकांच्या नेतृत्वाखालील टीमने केलेल्या समीक्षेमध्ये कोव्हीड-19 चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मास्कचा फारच कमी किंवा अगदी काहीच उपयोग झाला नाही, असं म्हटलं आहे. म्हणजेच मास्क घालतल्याने कोरोनाचा प्रादुर्भाव रोखता आला हे चुकीचं असल्याचं या संशोधकांचं म्हणणं आहे.
या अभ्यासंदर्भातील अहवाल कोचरेन लायब्रेरीने प्रकाशित केला आहे. हा अहवाल सादर करताना आधी करण्यात आलेल्या तपासण्यांमध्ये 78 नियंत्रित ट्रायल करण्यात आल्या. या ट्रायलमध्ये हात धुणे आणि फेस मास्क घातल्याने कोरोनाचा प्रादुर्भाव रोखता आला की नाही याची तपासणी करण्यात आली. स्लेट रिपोर्टनुसार कोचरेनच्या समीक्षकांनी जगभरामध्ये एव्हिडन्स-बेस्ड मेडिसिन म्हणजेच इलाज म्हणून वापरता येतील अशी औषधेच सर्वात यशस्वी ठरल्याचं म्हटलं आहे.
संशोधन करणाऱ्यांनी कोरोनाचा प्रादुर्भाव होण्याच्या पार्श्वभूमीवर मास्क वापरणे आणि न वापरणे अशा दोन कंडिशन तपासून पाहिल्या. मास्क वापरण्याचा आणि न वापरण्याचा विशेष फरक प्रादुर्भाव रोखण्यावर झाला नाही, असं हे संशोधक म्हणाले. मेडिकल मास्क आणि सर्जिकल मास्क किंवा एन95 मास्कमध्ये विशेष काही फरक नाही असंही संशोधकांनी म्हटलं आहे. या संशोधनामध्ये एन95 किंवा पी2 रेस्पिरेटर वापरण्याचा कोणताही फरक पडत नाही किंवा फार कमी फरक पडतो, असंही म्हटलं आहे.
'फॉक्स न्यूज'ने दिलेल्या माहितीनुसार 78 संशोधकांनी सर्व आर्थिक स्तरातील देशांमधील लोकांचा अहवाल बनवताना विचार केला आहे. हा अहवाल लिहिणाऱ्या संशोधकांनी वर्ष 2009 मध्ये एच1एन1 फ्लूची साथ, साथ नसतानाही होणारा फ्लूचा प्रादुर्भाव, वर्ष 2016 पर्यंत झालेला प्रादुर्भाव आणि हवामानाबरोबरच कोव्हिड-19 संदर्भातील आकडेवारी एकत्र केली.
'ब्लूमबर्ग'ने दिलेल्या वृत्तानुसार या संशोधनाचा निष्कर्ष निश्चित नाही. समीक्षकांनी सादर केलेल्या अहवालामधील काही महिती ही कोरोनाचा प्रादुर्भाव होण्याआधीची आहे जेव्हा प्रदुर्भाव वेगाने होत नव्हता. अनेकांनी मास्क वापरलं नाही. अन्य संशोधनांमध्ये इनडोअर म्हणजेच बंद जागेमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यात मास्क फायद्याचं ठरलं आहे, असं दिसून आलं आहे.