Light Pillars In Canada: अवकाश आणि अवकाशामध्ये घडणाऱ्या अनेक घडामोडी कायमच आकर्षणाचा आणि कुतूहलाचा विषय ठरतात. पण, याच अवकाशातील काही हालचालींमुळं सध्या कॅनडामध्ये भयंकर दहशत पाहायला मिळत आहे. कारण ठरतंय ते म्हणजे येथील आकाशात दिसलेले प्रकाशमान खांब.
काहींसाठी आकाशात दिसणारी ही दृश्य भारावणारी आहेत, तर काहींच्या मनात भलतीच भीती घर करताना दिसत आहे. आतापर्यंत अशी दृश्य फक्त चित्रपटांमध्ये किंवा एखाद्या सीरिजमध्ये पाहायला मिळाली होती. पण, प्रत्यक्षात असं काहीतरी अनपेक्षित घडणं सध्या संपूर्ण कॅनडामध्ये आणि जागतिक माध्यमांमध्येही चर्चेचा विषय ठरत आहेत. काही नागरिकांनी तर, हा पृथ्वीवर एलियननी केलेला हल्ला आहे असाही कयास बांधण्यास सुरुवात केली आहे.
प्रत्यक्षात मात्र तसं काही नसून, ही एक पूर्णत: नैसर्गित प्रक्रिया असल्याचं जाणकार सांगतात. आभाळातून थेट बर्फाळ भूभागापर्यंत येणाऱ्या या प्रकाशझोतांना 'लाईट पिलर्स' असं म्हटलं जातं. कॅनडाच्या सेंट्रल अल्बर्टा इथं ही घटना घडल्याचं पाहायला मिळालं. या भागामध्ये थंडीचा कडाका प्रचंड प्रमाणात वाढला असून, तापमान उणे 30 अंशांवर पोहोचत आहे. इतक्या थंडीमध्ये घडणारी ही घटना भारावणारी असल्याचं येथील स्थानिकांचं म्हणणं. नैसर्गिक क्रिया असणारी आकाशातील ही रचना एक ऑप्टिकल इलूजन आहे.
जेव्हा पृथ्वीच्या पृष्ठातून येणारा प्रकाश ढगांमधून भूपृष्ठावर येताना चहूदिशांना असणाऱ्या बर्फावर पडून परावर्तित होतो तेव्हा हे 'लाइट पिलर्स' किंवा प्रकाशाचे हे खांब तयार होतात. हवेत असणारे बर्फाचे लहानसे कण प्रकाशस्त्रोतांना परावर्तित करणाऱ्या लाखो लहान आरशांसम काम करतात. या हिमकणांचा आकार साधारण 0.02 मिमी इतका असून, त्यातूनच प्रकाशाची एक उभी रांग तयार होते. भूपृष्ठावरून पाहिल्यास हा प्रकाश आभाळातून पृथ्वीवर पडत आहे असंच वाटतं.
एकाच वेळी कमी अंतराच्या क्षेत्रामधील हवामानात असंख्य बदल होत असताना असे प्रकाशमान खांब पाहायला मिळतात. यासाठी तापमान साधारण उणे 10 ते उणे 40 अंश सेल्सिअसच्या दरम्यान असून, हवेत आर्द्रतेचं प्रमाणही जास्त लागतं. हवेचा झोत नसतानाच ही क्रिया शक्य होते. जेव्हाजेव्हा सूर्यकिरणांमुळं असे खांब तयार होतात तेव्हा त्यांना 'सन पिलर' असंही म्हटलं जातं. आहे की नाही कमाल?