रवि पत्की, मुंबई : मनस्वी गायक वसंतराव देशपांडे यांना विचारले गेले होते की, तुमचे घराणे कुठले तेव्हा त्यांनी निडरपणे ठणकावले होते" आमच्यापासून चालू होते आमचे घराणे". ह्या वाक्याने संगीतविश्वात सिंहगर्जना केली आणि हे वाक्य मनस्वी कलाकारांचे आत्मविश्वासाचे सुभाषित बनले. वसंतरावांना सांगायचं होतं मी स्वयंभू आहे, माझा स्वतः चा विचार आहे, तो पारंपारिक नसेल पण माझी संगीताकडे बघण्याची स्वतंत्र दृष्टी आहे. त्यामुळे मीच माझ्या घराण्याचा मूळ पुरुष आहे. सूर्यकुमार यादवची बॅटिंग बघताना वसंतराव आठवत रहातात. त्याच्या प्रत्येक नाविन्यपूर्ण शॉट मधून तो घोषित करत रहातो की, माझ्यापासून चालू होते माझे घराणे. (ravi patki blog on team india batsman suryakumar yadav hit classic shot)
वास्तविक बॅटिंग मध्ये सगळे मिळून पारंपरिक वीस पंचवीस शॉट्स असतील. पण गेल्या काही वर्षात त्यात नवनवीन शॉट्सची भर पडली.
पिटर्सन, डिविलिअर्स, मॅक्सवेल यांनी उलटे सुलटे कसेही शॉट्स मारून क्रिकेटला नवीन आयाम दिले. रिव्हर्स स्वीप, दिलस्कूप, रॅम्प शॉट, शॉवल शॉट, पॅडल स्वीप वगैरे नवीन शॉट्सची बॅटिंगमध्ये भर पडली.
अपारंपरिक आणि पारंपरिक सर्व शॉट्स दाखवणारा डिव्हिलिअर्स हा सर्वात परिपूर्ण बॅट्समन म्हणता येईल. सूर्यकुमार त्याच्या इतकीच innovative बॅटिंग करतोच आहे, वर त्याने स्वतःचे खास शॉटस develope केले आहेत. थर्डमन ते पॉईंट ह्या क्षेत्रात त्याने शॉट्सचे वेगळे दालन उघडले आहे. त्यात लेट स्टिअर आहे, उष्ट्रासनातला रॅम्प शॉट आहे.
आजकाल बॉलर्सनी धावा रोखण्याकरता offstump च्या बाहेर खोल टप्प्याचा चेंडू टाकण्याचे तंत्र विकसित केले आहे. त्याला उत्तर म्हणून सूर्यकुमारने क्रिझमध्ये मागे राहून पॉईंट आणि थर्डमन मधून लेट स्कूप शॉट develope केला आहे. हा खेळायला खूप अवघड आहे. तसेच सूर्यकुमारने आखूड टप्प्याच्या चेंडूला काहीही footwork न करता उभ्या उभ्या midoff च्या डोक्यावरून मारला.
लेग साईडला फाईनलेगच्या दिशेने मारलेले त्याचे बैठक शॉट चुकत नाहीत. त्याचे सगळे अनपेक्षित शॉट्स त्याचा नेटमधला रियाझ दाखवतात.अगदी झाकीर भाईंच्या शॉक value असलेल्या तबल्यावरच्या फ्रेजेस सारखा. त्याला संघात कमीतकमी चार वर्षे उशिरा घेतले आहे. पण तो आला तेव्हा finished product बनून आला आहे.
लोणचं मुरलेले आहे, त्यामुळे त्याचा स्वाद जबरदस्त आहे. एक परिपूर्ण, आत्मविश्वासाने ओतप्रोत भरलेला, नाविन्याचा झरा वहात आहे. त्यात आपण रसिक चिंब होऊया.