जयवंत पाटील, झी २४ तास, मुंबई : प्रत्येक पिढी घडवताना, त्या-त्या काळातील प्रसार माध्यमं फार महत्त्वाची भूमिका पार पाडतात. जेव्हा फक्त वर्तमान पत्र होती, तेव्हा आजोबा आणि वडील या न्यूज पेपरमध्ये काय वाचतात, त्यावर त्यांची काय चर्चा होते. याकडे तुमच्या घरातील लहानग्यांची नजर असते, यानंतर आलेल्या पिढीने रेडिओवर कोणत्या बातम्या आल्या, त्यावर काय चर्चा आहे, कुणाची काय मतं आहेत, याप्रमाणे पिढ्या घडल्या, पुढे टेलव्हिजन युगात हे झालं आणि इंटरनेट युगातही हेच होत आहे. राकेश झुनझुनवालाही असेच घडले.
राकेश झुनझुनवाला यांचे वडील आणि त्यांचे मित्र शेअर मार्केटवर गप्पा मारत असत, कोणत्या कंपनीत काय घडामोडी आहेत, कोणत्या कंपनीने कोणत्या कंपनीसोबत काय करार केला, कोणतं नवीन प्रॉडक्ट बाजारात आणलं, याचा कंपनीला फायदा होईल की नुकसान, हे ते वर्तमान पत्र म्हणजे न्यूज पेपरच्या बातम्या वाचून गप्पा मारत असत, त्य़ांचे मित्र कुठे गुंतवणूक करायची, कोणते शेअर घ्यायचे हे ठरवत असतं.
हेच राकेश झुनझुनवाला यांच्या कानावर पडत आलं. राकेश झुनझुनवाला याचा चांगला अभ्यास करु लागले, न्यूज पेपरची माहिती कधीच चिकित्सक वृत्तीने वाचू लागले, विश्लेषण करु लागले. पण तेव्हा त्यांनी एकपैसाही बाजारात लावलेला नव्हता, पण कंपनीच्या तिमाही बॅलेन्स शीट त्यांच्या तोंडपाठ होत असत.
अशातच त्यांनी शेअर बाजारात पाऊल टाकायचं ठरवलं, त्यावर वडील म्हणाले भावाप्रमाणे आधी सीएचं शिक्षण पूर्ण कर, मुंबईत माझं घर आहे, हे तुमच्यासाठी आहे, पण शेअर बाजारात उतरायला पैसे मागशील, हात माझ्यापुढे पसरवशील, तर माझी मुठ बंद आहे.
पण पुढे काही वर्षांनी सीएचं शिक्षणपूर्ण केल्यानंतर राकेश झुनझुनवाला शेअरबाजारात उतरले, यावेळी त्यांच्या आईने सांगितलं, तुला मुलगी कोण देईल, शेअरबाजार सांगितलं तर तुझं लग्न कसं होईल, यावर ते म्हणाले, तुझ्या मोठ्या मुलाचं लग्न झालं आहे, तुला सून घरात आली आहे, आता लहान सून कशाला हवीय तुला त्रास द्यायला? असा गंमतीत त्यांनी आईला प्रश्न केला होता.
राकेश झुनझुनवाला हे शेअर मार्केट जगतातील महत्त्वाचं नाव आहे. राकेश झुनझुनवाला अगदी हातावरच्या पैशांवर शेअरबाजारात वर आलेले आहेत, झुनझुनवाला यांच्या पोर्टफोलिओत कोणते शेअर आहेत, यावर सर्वांची नजर असते. सर्वसामान्य व्यक्ती शेअर बाजारातून कशी करोडपती होवू शकते, यासाठी त्यांच्याकडे पाहिलं जातं, त्यांना शेअर बाजारातील बिग बूल असंही म्हणतात.