मुंबई : रिअॅलिटी शोमधून अनेक स्पर्धकांना आता मराठी इंडस्ट्रीत एन्ट्री मिळत आहेत. याची अनेक उदाहरण आपण पाहिलेत आहेत मग तो गायक असो वा कलाकार. अशाच पद्धतीने आता एका रिअॅलिटी शोमधील 12 वर्षांचा चैतन्य देवढे आता मराठीत गायक म्हणून डेब्यू करत आहे. संजय जाधव चैतन्यला आपला सिनेमा 'लकी' मधून पार्श्वगायक म्हणून प्रेक्षकांच्या समोर घेऊन येत आहे. या अगोदर संजय जाधव यांनी 'दुनियादारी' सिनेमातून 'लिटील चॅम्प' रोहित राऊतला लाँच केलं होतं.
‘संगीत सम्राट’, ‘राइझिंग स्टार’ अशा रिएलिटी शोमधून दिसलेला आळंदीचा ‘चैतन्य देवढे’ ‘लकी’ बॉय ठरलेला आहे. चैतन्यच्या निवडी विषयी फिल्ममेकर संजय जाधव सांगतात, “ह्या गाण्याच्या सिच्युएशनसाठी आम्हाला एका लहान मुलाचा आवाज हवा होता. आणि वैभव चिंचाळकरने मला चैतन्यचे नाव सुचवले. चैतन्यला आवाजाचे दैवी वरदान लाभले आहे. त्याच्यातली निरागसता मला खूप भावली.”
चैतन्य देवढे म्हणतो, “मी स्वत:ला खूप लकी समजतो, की सिनेसृष्टीतल्या अशा दिग्गजांसोबत मला काम करण्याची संधी मिळाली. आजपर्यंत पंकज पडघन ह्यांनी संगीतबद्ध केलेली गाणी ऐकली होती आणि संजयदादांचे सिनेमे पाहिले होते. पण ह्या दोन दिग्गजांना प्रत्यक्ष भेटायची आणि त्यांच्या सिनेमातून चित्रपटसृष्टीत लाँच होण्याची संधी मला मिळाली, ही माझ्यावर माऊलींचीच कृपा आहे, असे मी मानतो.”