मुंबई : आशियातील सर्वात जुना आणि भारतातील सर्वात मोठा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव शनिवारपासून गोव्यात सुरू होत आहे. आजपासून 8 दिवस चालणाऱ्या या महोत्सवात OTT प्लॅटफॉम देखील भाग घेणार आहेत. 28 नोव्हेंबरपर्यंत गोव्यात आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव साजरा होणार आहे. हॉलिवूड चित्रपट दिग्दर्शक इस्तवान साबो आणि मार्टिन स्कोर्से यांना या महोत्सवात 'सत्यजित रे लाइफ टाईम अचिव्हमेंट पुरस्कारा'ने (Satyajit Ray Life Time Achievement Award) सन्मानित करण्यात येणार आहे.
त्याचबरोबर हेमा मालिनी (Hema Malini) आणि गीतकार प्रसून जोशी (Prasoon Joshi) यांना 'इंडियन फिल्म पर्सनॅलिटी ऑफ द इयर पुरस्कारा'ने (Indian Film Personality of the Year Award) सन्मानित करण्यात येणार आहे. महत्त्वाचं म्हणजे यंदाच्या वर्षी आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव सर्वांना ऑनलाईन पाहाता येणार आहे.
ज्यासाठी Netflix, Amazon Prime, Zee5, Voot आणि Sony Live सारख्या मोठ्या OTT प्लॅटफॉर्मना आमंत्रित करण्यात आलं आहे. गेल्या 5 दशकांपासून IFFI सुरू आहे. 52 व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात सत्यजित रे यांचे अनेक चित्रपट दाखवले जाणार आहेत. दरवर्षी चित्रपट महोत्सवादरम्यान भारतातील आणि जगभरातील सर्वोत्कृष्ट चित्रपट दाखवले जातात.