सोहेल खानने हा व्हिडीओ त्यांच्या जामनगरच्या प्रवासाच्या दरम्यान शूट केला होता. ज्यात सर्व कुटुंबीय आणि मित्र एकत्र विमानात आरामात गप्पा मारताना आणि खेळत असताना दिसत आहेत. सोहेल खान जो नेहमीच आपल्या आयुष्याच्या खास क्षणांचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत असतो. त्याने या व्हिडीओसोबत कॅप्शनमध्ये लिहिले, 'हॅपी बर्थडे भाई आणि आयत.' आयत ही सलमान खानची बहीण अर्पिता शर्मा आणि आयुष शर्मा यांची मुलगी आहे. सलमान आणि आयत दोघांचा वाढदिवस एकाच दिवशी येतो. त्यामुळे त्या दिवशी कुटुंबाने दुप्पट आनंद साजरा केला.
व्हिडीओमध्ये सर्व कुटुंबीय विमानात एकत्र गप्पा मारताना दिसत आहेत आणि मुले खेळ खेळण्यात व्यस्त आहेत. यावेळी रितेश देशमुख आणि जेनेलिया डिसूझा यांच्याही उपस्थितीमुळे या व्हिडीओवर चाहत्यांचे आणखी लक्ष वेधले आहे. युलिया वंतूरही या कुटुंबीयांसोबत विमानात दिसत आहे. तिचे आणि सलमानचे खास नाते सोशल मीडियावर कायमचं चर्चेत असते. युलिया आणि सलमान यांनी काही वेळा एकमेकांसोबत फोटो आणि व्हिडीओ शेअर केले आहेत. ज्यामुळे त्यांचा नात्याचा अंदाज आणि जोडीची केमिस्ट्री चाहत्यांना नेहमीच आकर्षित करते.
सलमान खान आणि त्याच्या कुटुंबीयांनी 27 डिसेंबर 2024 रोजी सलमान खानचा 59 वा वाढदिवस मोठ्या थाटामाटात साजरा केला. यावेळी कुटुंबातील सर्व सदस्य आणि जवळचे मित्र एकत्र आले होते. एका व्हिडीओमध्ये सलमान खान आणि त्याची भाची आयत एकत्र केक कापताना दिसत आहेत आणि हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. कुटुंबीय आणि मित्र यांच्यातील सामूहिक आनंद आणि प्रेमाने हा व्हिडीओ खूप लोकप्रिय झाला.
सलमान खानचा आगामी चित्रपट 'सिकंदर'चा टीझर 28 डिसेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटातील सलमान खानच्या फर्स्ट लूक पोस्टरने सोशल मीडियावर चांगलीच चर्चा सुरू केली आहे. 'सिकंदर' हा चित्रपट 2025 साली ईदच्या दिवशी रिलीज होणार आहे. ज्यामध्ये सलमान खान सोबत अभिनेत्री रश्मिका मंधाना मुख्य भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाच्या टीझरला खूपच चांगला प्रतिसाद मिळाला आहे. हा टीझर सलमान खानच्या वाढदिवसाच्या दिवशी प्रदर्शित होणार होता, परंतु माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या निधनामुळे त्याला एक दिवस पुढे ढकलण्यात आले.
सलमान खानच्या वाढदिवसानिमित्त कुटुंबाने एकत्र असलेल्या या व्हिडीओने त्यांच्या चाहत्यांना पुन्हा एकदा त्यांच्या कुटुंबीयांसोबत असलेला आनंदी आणि गोड क्षण अनुभवण्याची संधी दिली आहे.