मुंबई : स्टार प्रवाहवरील 'आई कुठे काय करते' मालिका आता नव्या वळणावर आहे. अनिरूद्ध आणि अरूंधतीचा घटस्फोट झाला आहे. 26 वर्षांचं नातं अखेर तुटलं आहे. तर दुसऱ्या बाजूला संजनाने देखील शेखरसोबतच्या घटस्फोटाच्या पेपरवर सह्या केल्या आहेत. यानंतर संजना अनिरूद्धसोबतच्या लग्नाकरता उतावळी झाली आहे. सोशल मीडियावर या दोघांच्या लग्नाची पत्रिका देखील व्हायरल झाली आहे.
अनिरूद्धसोबत लग्न करण्याचं स्वप्न गेले अनेक वर्ष संजना उराशी बाळगून आहे. अनिरूद्ध - अरूंधतीचा घटस्फोट झाल्यानंतर आपल्या गळ्यात लवकरच अनिरूद्धच्या नावाचं मंगळसूत्र असेल याची स्वप्न संजना पाहत आहे. याकरता आता तिने शॉपिंगला देखील सुरूवात केली आहे. लग्नाचं नातं अधिक स्पष्ट करण्यासाठी मंगळसूत्र देखील संजनाने खरेदी केलं आहे.
चि. अनिरूद्ध यांचा विवाह चि.सौ.का संजनासोबत ठरला आहे. हा विवाह आई कांचन यांची प्रकृती स्थिर असेल तेव्हा योजन्यात आला आहे. विवाह स्थळ संजना ठरवेल तेव्हा आणि विवाह मुहूर्त - शेखर यायच्या आत असं लिहिण्यात आलं आहे. तसेच आपले नम्र आई कांचन देशमुख आणि विनायक देशमुख म्हणजे आप्पा. या लग्नाला विशेष उपस्थिती ही अरूंधती देशमुखची असणार आहे. यासोबत एक भावनिक गाणं देखील असणार असल्याचं म्हटलं आहे. यामध्ये छोटे निमंत्रक निखिल, निहार, मीनू, अबोली असून मानाची करवली ही विशाखा असणार आहे. आमच्या पप्पाच्या लग्नाला यायचं हं असं म्हणत ईशा, यश, अभिषेक यांची नाव देण्यात आली आहे.