मुंबई : घरात बाळ आलं की सारंकाही हवंहवंसं वाटतं, असं म्हणतात. बाळ घराचं गोकुळ करतो, हे खरं. पण, बाळाच्या जन्मापर्यंतचा हा प्रवास तितका सोपा नसतो. प्रचंड काळजी घेत एक आई, तिच्या बाळाला या जगात आणते आणि पुढे तिच्या नव्या आयुष्याचीच सुरुवात होते.
बाळ्याच्या येण्यानं फक्त जन्मदात्री आईच नव्हे, तर घरातल्या प्रत्येकाचाच नव्यानं जन्म झालेला असतो.
एका अतिशय लोकप्रिय अभिनेत्यानंही त्याच्या जीवनात बाळाल्या जन्मानंतरच्या परिस्थितीचा उलगडा केला.
विविध भूमिकांच्या माध्यमातून त्यानं कायमच प्रेक्षकांचं मनोरंजन केलं, पण प्रत्यक्षात मात्र तो फार आव्हानात्मक परिस्थितीतून जात होता.
हा अभिनेता म्हणजे महेशबाबू. त्यानं अभिनेत्री नम्रता शिरोडकर हिच्याशी लग्नगाठ बांधली. 2006 मध्ये या जोडीनं बाळाचं स्वागत केलं.
हैदराबादमधील एका रुग्णालयात त्याचा मुलगा गौतम कृष्ण याचा जन्म झाला. पण, जन्माच्या वेळी तो फारच नाजुक होता.
आज गौतम 16 वर्षांचा झाला असला तरीही जन्माच्या वेळी मात्र तो हाताच्या तळव्याइतका लहान होता, त्याला पाहताच माझ्या डोळ्यात पाणी आलं होतं, असं महेशबाबू म्हणाला.
एका कार्यक्रमादरम्यान त्यानं हे वक्तव्य केलं. त्यानं सांगितलं की गौतमचा जन्म प्रसूतपूर्व काळात झाला होता, ज्यामुळं तो फार लहान होता.
बाळाच्या जन्मानंतरच महेशबाबूला अशा मुलांसाठी काम करण्याची इच्छा झाली, ज्यांना हृदयाची आवश्कता आहे.
आजपर्यंतच्या या प्रवासात त्यानं जवळपास 1000 गरजवंत चिमुकल्याच्या मोफत शस्त्रक्रियेचं लक्ष्य गाठलं.
'मी त्याला हातात घेतलं तेव्हा तो हातभरच होता.... आता तो 6 फूट उंच झाला आहे. त्यावेळी आमच्याकडे आर्थिक पाठबळ होतं म्हणून गौतमची काळजी व्यवस्थित घेता आली.
पण, अशा व्यक्तींचं काय ज्यांच्याकडे असं पाठबळ नाही. अशा लहान मुलांसाठी मला कायम काहीतरी काम करायचं होतं. अखेर मी अशा गरजू मुलांसाठी काम करायचं ठरवलं ', असं तो म्हणाला.
एक सुपरस्टार असतानाही बाळ्याच्या जन्मावेळी काही क्षण असे आले जेव्हा महेशबाबू हतबल झाला. पण, आज परिस्थिती वेगळी आहे.