अभिनेत्री अमृता सिंगचे आयुष्य चढ-उतारांनी भरलेले आहे. पण एक वेळ अशी आली की अभिनेत्रीचे चित्रपट चालणे बंद झाले. त्याचबरोबर तिला तिच्या वैयक्तिक आयुष्यातही अनेक चढ-उतारांना तोंड द्यावे लागले. तिने बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानशी लग्न केलं. जे त्या काळात सर्वात जास्त चर्चेत राहिलं. कारण लग्नाच्या वेळी सैफ अमृतापेक्षा 13 वर्षांनी लहान होता. पण अभिनेत्री अमृता सिंगच्या आयुष्यात येणारा सैफ हा एकटाच नव्हता. सैफ अली खानच्या आधी अभिनेत्री दोघांना डेट करत होती. आज आपण तिच्या वाढदिवसानिमित्त ती तिच्या कारकिर्दीत कोणत्या नात्यांमध्ये होती ते जाणून घेऊयात.
1991 मध्ये सैफ अली खानसोबत लग्न आणि घटस्फोट
सैफ अली खान आणि अमृता सिंग यांच्या वयात 13 वर्षांचे अंतर होते आणि त्यांचे लग्न फक्त 13 वर्षे टिकले. अभिनेता सैफ अली खानने 1991 मध्ये अमृता सिंगशी लग्न केलं होतं. या लग्नापासून त्यांना दोन मुले झाली. ज्यामध्ये सारा अली खान आणि इब्राहिम अली खान अशी त्यांची नावे आहेत. साराने पदार्पण केले आहे आणि इब्राहिम देखील आता पदार्पणासाठी सज्ज आहे.2004 मध्ये सैफ अली खान आणि अमृता यांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी सैफने अमृतावर आरोप केले होते आणि हे लग्न का मोडत आहे हे देखील सांगितले होते. यानंतर सैफने बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूरशी लग्न केलं. या लग्नापासून देखील त्याला 2 मुले आहेत.
रवी शास्त्री यांच्याशी जोडले होते नाते
फार कमी लोकांना माहिती असेल की सैफ अली खानसोबत लग्न करण्यापूर्वी अमृता सिंग ही भारतीय क्रिकेट संघाचे अष्टपैलू खेळाडू रवी शास्त्री यांच्यासोबत नात्यामध्ये होती अशी चर्चा होती. दोघांचे लग्नही ठरले होते पण रिपोर्टनुसार, रवी शास्त्रींनी एक अट टाकली होती. त्यामुळे सगळं बिघडलं. खरंतर रवीची इच्छा होती की अमृताने लग्नानंतर चित्रपट सोडावे. तर अमृताला हे मान्य नव्हते.
अभिनेता विनोद खन्ना यांनाही केलं डेट
तर रवी शास्त्री यांच्यानंतर अमृता सिंगचे नाव एका दिग्गज अभिनेत्याशी जोडले होते. अमृता सिंग आणि विनोद खन्ना यांचेही अफेअर असल्याच्या बातम्या येत होत्या. अमृताला भेटल्यानंतर विनोद खन्ना हे पत्नी गीतांजलीपासून वेगळे झाले होते असं म्हटलं जात आहे. विनोद खन्ना हे अमृता पेक्षा 12 वर्षांनी मोठे होते. पण दोघांमधील नाते फार काळ टिकले नाही.