Subedaar Teaser : बॉलिवूड अभिनेता अनिल कपूर आज त्याचा 68 वा वाढदिवस साजरा करत आहे. वाढदिवसानिमित्त चाहते देखील अनिल कपूरचे अभिनंदन करत आहेत. अशातच अनिल कपूरनेही चाहत्यांना एक भेट दिली आहे. अभिनेत्याने त्याच्या 68 व्या वाढदिवसानिमित्त 'सुबेदार' या नव्या चित्रपटाची घोषणा केली असून या चित्रपटाचा फर्स्ट लूकही सोशल मीडियावर शेअर केला आहे.
अनिल कपूरच्या आगामी 'सुबेदार' या चित्रपटाचा टीझर रिलीज झाला असून हा टीझर 1 मिनिट, 47 सेकंदाचा आहे. या टीझरची सुरुवात अनिल कपूर बसलेल्या घरातील एका दृश्याने सुरू होते. हे घर लोकांनी घेरलेले असून दारावर टकटक करत आणि शिपायाला बाहेर येण्यास सांगत आहेत. यानंतर अनिल कपूरचा लूक समोर येतो, ज्यामध्ये तो हातात बंदूक घेऊन खुर्चीवर बसलेला दिसतोय. तो धारदार स्वरात म्हणतो - 'सैनिक तयार.'
अभिनेत्याने शेअर केली पोस्ट
अनिल कपूरने नुकताच त्याच्या वाढदिवसानिमित्त त्याच्या 'सूबेदार' चित्रपटाचा टीझर इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. त्यासोबतच अभिनेत्याने टीझर शेअर करताना त्याला कॅप्शन देखील दिलं आहे. ज्यामध्ये त्याने म्हटले आहे की, एका चांगल्या दिवशी एका चांगल्या गोष्टीची घोषणा केली पाहिजे. 'सूबेदार', नवीन चित्रपट लवकरच येत आहे.
राधिका मदान ही दिसणार मुख्य भूमिकेत
'सुबेदार'मध्ये बॉलिवूड अभिनेता अनिल कपूरसोबत अभिनेत्री राधिका मदानही महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. 'सुबेदार' या चित्रपटाचे दिग्दर्शन सुरेश त्रिवेणी यांनी केले असून प्रज्वल चंद्रशेखर यांच्यासोबत त्यांनी या चित्रपटाचे लेखन केले आहे. विक्रम मल्होत्रा, सुरेश त्रिवेणी आणि अनिल कपूर यांनी अबुंदंतिया एंटरटेनमेंट, ओपनिंग इमेज आणि अनिल कपूर फिल्म अँड कम्युनिकेशन नेटवर्क प्रायव्हेट लिमिटेडच्या बॅनरखाली या चित्रपटाची निर्मिती करण्यात आली आहे. 'सुबेदार' हा चित्रपट प्राइम व्हिडीओवर रिलीज होणार आहे. मात्र त्याची रिलीज डेट अद्याप जाहीर करण्यात आलेली नाहीये.