मुंबई : अभिनेता हृतिक रोशन याच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. सर्वकाही सुरळीत सुरु असतानाच एकाएकी हृतिकच्या कुटुंबातून एका व्यक्तीचं निधन झाल्याची माहिती समोर आली. रोशन कुटुंबातील या व्यक्तीनं जगाचा निरोप घेतल्याचं कळताच कलाजगतातून या कुटुंबाचं अनेकांनीच सांत्वन केलं.
हृतिकची आजी, पद्मा राणी ओमप्रकाश यांनी 16 जून रोजी मुंबईत अखेरचा श्वास घेतला. गेल्या काही काळापासून त्यांची प्रकृती ढासळली होती. (Bollywood Actor Hrithik Roshan grandmother padma rani omprakash dies)
सूत्रांच्या माहितीनुसार हृतिकच्या आजीनं वयाच्या 91 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. गेल्या बऱ्याच काळापासून त्या अंथरुणाला खिळल्या होत्या. वाढत्या वयामुळं उदभवणाऱ्या आजारपणानं त्यांना ग्रासलं होतं.
पद्मा राणी या चित्रपट निर्माते- दिग्दर्शक जे ओमप्रकाश यांच्या पत्नी होत्या. जे. ओमप्रकाश यांचं 2019 मध्ये निधन झालं होतं. पिंकी रोशन यांचे ते वडील. पिंकी यांनी शेअर केलेल्या बऱ्याच फोटोंमध्ये पद्मा राणी अंथरुणातच दिसल्या होत्या.
कोण होते हृतिकचे आजोबा?
जे ओमप्रकाश हे लोकप्रिय निर्माते आणि दिग्दर्शक होते. त्यांनी 'कसम' या चित्रपटापासून दिग्दर्शनात पदार्पण केलं होतं. 'आई मिलन की बेला', 'आस का पंछी', 'आए दिन बहार के', 'आंखों आंखों में', 'आया सावन धूम के' अशा चित्रपटांची त्यांनी निर्मिती केली होती. वयाच्या 93 व्या वर्षी त्यांनी जगाचा निरोप घेतला होता.