मुंबई : रणवीर सिंगची मुख्य भूमिका असणाऱ्या '८३' या चित्रपटाच्या चित्रीकरणाला मोठ्या दणक्यात सुरुवात झाली आहे. रणवीर आणि कलाकारांची तगडी फौज असणाऱ्या या चित्रपटातून क्रीडा विश्वातील असा एक प्रसंग रुपेरी पडद्याच्या माध्यमातून साकारण्यात येणार आहे, ज्याचा प्रत्येक भारतीयाला अभिमान आहे.
गेल्या काही दिवसांपासून या चित्रपटासाठी कलाकारांनी धरमशाला येथे सरावही केला. याविषयीचीच माहिती रणवीरने देत येत्या काळात ते ग्लासगो येथे पुढील चित्रीकरण सुरू असल्याचं स्पष्ट केलं.
चित्रपटाविषयी मोठ्या आत्मियतेने काही खास गोष्टी सांगणाऱ्या रणवीरने असाच एक किस्साही सांगितला. ज्यामध्ये त्याने चित्रपटात यशपाल शर्मा यांची व्यक्तीरेखा सकारणाऱ्या जतिन सरना म्हणजेच सेक्रेड गेम्स फेम बंटीसोबत घडलेल्या घटनेविषयी सांगितलं. जतिनने चित्रपटासाठी फार मेहनत घेतल्याचं सांगत तो जास्तीत जास्त वेळ क्रिकेट खेळताना दिसत असल्याची माहिती रणवीरने दिली. आपल्या भूमिकेसाठी मेहनत घेणाऱ्या जतिनला असाच एके दिवशी सरावादरम्यान चेंडूचा अंदाज आला नाही. ज्यामुळे चेंडू त्याच्या संवेदनशील जागी लागला. एल गार्ड घातलेलं असल्यामुळे त्याला फार गंभीर दुखापत झाली नाही, असंही रणवीरने सांगितलं.
रणवीर सध्याच्या घडीला त्याच्या या संघासोबत धमाल करताना दिसत आहे. या साऱ्यामध्ये त्याला साथ मिळत आहे, ती म्हणजे कपिल देव यांच्या मार्गदर्शनाची. फक्त कपिल देवच नव्हे तर, ८३ विश्वचषकात सहभागी असणाऱ्या ज्येष्ठ क्रिकेटपटूंचं मार्गदर्शन '८३'मधील सर्वच कलाकारांना लाभत आहे. परिणामी कबीर खान दिग्दर्शित या चित्रपटासाठीची उत्सुकता आतापासूनच शिगेला पोहोचली आहे.