ऋषी कपूर यांचा अखेरचा संदेश आणि लॉकडाऊनच्या काळातील 'ते' वादग्रस्त ट्विट

वाचा ते नेमकं काय म्हणाले होते.

Updated: Apr 30, 2020, 10:58 AM IST
ऋषी कपूर यांचा अखेरचा संदेश आणि लॉकडाऊनच्या काळातील 'ते' वादग्रस्त ट्विट  title=
संग्रहित छायाचित्र

मुंबई : भारतीय चित्रपट विश्वामध्ये एका प्रतिष्ठित कुटुंबातून आलेल्या ज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर Rishi Kapoor यांनी जीवनाच्या व्यपीठावरून कायमची एक्झिट घेतली आहे. गेल्या काही काळापासून कॅन्सरशी झुंज देत असताना अखेर कपूर यांनी गुरुवारी वयाच्या ६७ व्या वर्षी शेवटचा श्वास घेतला. बॉलिवूड वर्तुळासाठी हा एक धक्काच. 

'चॉकलेट बॉय'पासून ते अगदी खलनायकी भूमिकांनाही तितक्याच ताकदीने साकारणाऱ्या ऋषी कपूर यांनी कलाविश्वासोबतच एक नागरिक म्हणूनही आपल्या भूमिका कायम अतिशाय परखडपणे मांडल्या. स्पष्टवक्तेपणा हा त्यांचा स्वभावविशेष. सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांच्या स्पष्चवक्तेपणाची अनेक उदाहरणंही पाहायला मिळाली. किंबहुना अनेकदा त्यांना यामुळे वादाच्या भोवऱ्यातही यावं लागलं होंत. अशा या अभिनेत्याने काही दिवसांपूर्वीच एक ट्विट केलं होंत. अर्थाच ते ट्विट त्यांचं अखेरचं ट्विट ठरलं. ज्यातून त्यांनी देशवासियांसाठी एक अत्यंत सुरेख आणि अनुकरणीय संदेश दिला होता. 

'प्रत्येक सामाजिक स्तरातील सर्वच बंधु आणि भगिनींना मी एक आवाहन करतो, कृपया हिंसा, दगडफेक किंवा झुंडशाहीच्या आहारी जाऊ नका. डॉक्टर, परिचारिका, पोलीस कर्मचारी, आरोग्य सेवक हे सर्वजण त्याचा जीव धोक्यात टाकून तुम्हाला संरक्षण देत आहेत', असं लिहित कोरोना विषाणूच्या आव्हानात्मक काळात सबंध देशाला एकजुटीने राहण्याचा संदेश दिला. 

....तर, या ट्विटमुळे सोशल मीडियावर संमिश्र प्रतिक्रिया 

हिंसेच्या वाटेवर न जाण्याचं आवाहन करणाऱ्या ऋषी कपूर यांनी लॉकडाऊनच्या या काळात असंच एक ट्विट केलं होतं. ज्यामुळे ते वादाच्या भोवऱ्याच अडकले होते.. दारुविक्री करणारी दुकानं सुरु करावीत असा प्रथम सूर त्यांनीच आळवला होता. 
'विचार करा. सरकारने संध्याकाळी तरी दारुची दुकानं उघडी ठेवण्याला परवानगी द्यावी. यात चुकीचा अर्थ काढू नका. खिन्न आणि अनिश्चिततेच्या या काळात लोकं घरी आहेत, त्यांना दिलासा मिळेल. काळ्या बाजारात तर दारूची विक्री होत आहे,' असं ऋषी कपूर म्हणाले होते. त्यांच्या या ट्विटवर संमिश्र प्रतिक्रिया पाहायला मिळाल्या होत्या. मुख्य म्हणजे कपूर यांच्या या ट्विटनंतर राजकीय पटलावरही या मुद्द्याच्या बऱ्याच चर्चा झाल्या. 

 

राज्य सरकारला अबकारी करामधून आर्थिक मदतीची अपेक्षा आहे. आता या तणावाच्या वातावरणात नैराश्याची भर पडू नये ,बी बाब स्पष्ट करत लोकं मद्यप्राशन करत आहेत तर या काळात कायदेशीर करयला हरकत काय असं म्हणत हे फक्त माझे विचार असल्याचं ट्विटमध्ये नमुद केलं होतं. देशातील परिस्थिती, सद्यस्थिती आणि त्यावर ऋषी कपूर यांचं ट्विट हा नेटकऱ्यांसाठी एक आकर्षणाचाच विषय होता. पण, यापुढे मात्र परखड मतांची ही शृंखला इथेच थांबणार आहे. कारण, ऋषी कपूर यांनी जगाचा निरोप घेतला आहे.