सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणी भन्साळींच्या चौकशीदरम्यान नेमकं काय घडलं?

दर दिवशी या प्रकरणी नवी माहिती समोर येऊ लागली आहे   

Updated: Jul 7, 2020, 06:14 PM IST
सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणी भन्साळींच्या चौकशीदरम्यान नेमकं काय घडलं?  title=
संग्रहित छायाचित्र

मुंबई : अभिनेता sushant singh rajput सुशांत सिंह राजपूत यानं काही दिवसांपूर्वीच मुंबईतील राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली. त्याच्या आत्महत्येनंतर उपस्थित झालेले अनेक अनुत्तरित प्रश्न आणि काही स्तरांतून होणारे गंभीर आरोप पाहता अखेर मुंबई पोलिसांकडून या प्रकरणाची चौकशी सुरु करण्यात आली. आतापर्यंत याअंतर्गत जवळपास २९  जणांची चौकशी करण्यात आली आहे. ज्यामध्ये प्रसिद्ध चित्रपट निर्माते- दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांच्याही नावाचा समावेश आहे. 

सोमवारीच भन्साळींची मुंबई पोलिसांनी याप्रकरणी चौकशी केली, त्यावेळी आपण २०१६ पासून सुशांतच्या संपर्कात नसून, त्याच्या नैराश्याबाबत कोणतीही माहिती नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. 'बाजीराव मस्तानी' आणि 'राम लीला' या चित्रपटांमद्ये सुशांतच्या सहभागाविषयी भन्साळींना विचारलं असता त्यावेळी तो यशराज फिल्म्स या बॅनरअंतर्गत साकारल्या जाणाऱ्या आणि शेखर कपूर दिग्दर्शित 'पानी' या चित्रपटावर एककेंद्री होती, असं ते म्हणाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. 

डीएनएनं सूत्रांचा हवाला देत प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार संजय लीला भन्साळी यांनी कधीच सुशांतला त्यांच्या चित्रपटांतून वगळलं नव्हतं. शिवाय खुद्द सुशांतनंच त्यांचे हे चित्रपट नाकारले होते, अशी माहितीही जवळपास तीन तास चाललेल्या या चौकशी सत्रात बाहेर आली. 

सुशांतच्या निधनानंतर अशी झाली अंकिताची अवस्था; अभिनेत्रीनं सांगितली कहाणी

 

भन्साळींसोबतच्या चौकशीतून बाहेर आलेली ही माहिती आणि त्याच्याशी सुशांतचा असणारा संबंध पाहता आता यातून आत्महत्या प्रकरणातील काही धागेदोरे समोर येतात का, याकडे अनेकांच्या नजरा लागल्या आहेत. दरम्यान, अनपेक्षितपणे आयुष्याच्या प्रवासातून अलविदा म्हणणाऱ्या सुशांतची अकाली एक्झिट चाहत्यांपासून साऱ्या कलाविश्वालाच चटका लावून जाणारी आहे. असं असलं तरीही येत्या काळात तो 'दिल बेचारा' या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.