मुंबई : विविध भूमिकांना न्याय देत अभिनेता शाहिद कपूर याने त्याच्या अभिनयाची प्रचिती सर्वांनाच दिली आहे. त्यात आता तो आणखी एका व्यक्तीरेखेची भर टाकत आहे. ती व्यक्तीरेखा आहे 'कबीर सिंग' याची. शाहिदची मुख्य भूमिका असणाऱ्या 'कबीर सिंग' या चित्रपटाचा टीझर नुकताच प्रदर्शित करण्यात आला. ज्यामध्ये त्याचा धडाकेबाज अंदाज पाहायला मिळत आहे. तेलुगू चित्रपटाचा रिमेक असणाऱ्या 'कबीर सिंग'चा टीझर नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला. ज्याची झलक पाहता शाहिद पुन्हा त्याच्या अभिनयाच्या बाबतीत किती प्रयोगशील आहे, हेच स्पष्ट होत आहे.
अवघ्या एक मिनिटाच्या ट्रेलरमध्ये हा 'कबीर सिंग' नेमका आहे तरी, कोण याची ओळख होत आहे. विद्यार्थी, गुंड, डॉक्टर अशा रुपांपैकी प्रत्येक रुपाची झलक टीझरमधून पाहायला मिळत आहे. 'अर्जुन रेड्डी' या तेलुगू चित्रपटाचं जिग्दर्शन करणाऱ्याच संदीप वंगाने 'कबीर सिंग'च्याही दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. त्यामुळे अर्थातच चित्रपटात अफलातून स्टंटबाजी आणि काही साहसदृश्यं पाहायला मिळणार यात वाद नाही.
किआरा अडवाणी या चित्रपटात शाहिदसोबत स्क्रीन शेअर करत असून, या दोघांची ऑनस्क्रीन केमिस्ट्री प्रथमच प्रेक्षकांना पाहता येणार आहे. वैद्यकिय क्षेत्रात काम करणारा पण, व्यसनाधीन गेलेला एक व्यक्ती स्वत:च्याच आयुष्याला कशा प्रकारे चुकीच्या मार्गावर ढकलतो आणि त्याच्या आयुष्याची चक्र नेमकी कशी चालतात यावर चित्रपटातून प्रकाशझोत टाकण्यात येणार आहे.
शाहिदचा हा लूक आणि त्याची भूमिका पाहताना 'उडता पंजाब' या चित्रपटात त्याने साकारलेल्या 'टॉमी सिंग'चीही आठवण होते. तेव्हा आता हा कबीर सिंग, प्रेक्षकांची मनं जिंकणार का याकडेच अनेकांचं लक्ष लागलं आहे. २१ जूनला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. दाक्षिणात्य चित्रपटांची प्रेक्षकांमध्ये असणारी लोकप्रियता लक्षात घेता याआधीही बऱ्याच दाक्षिणात्य चित्रपटांचा रिमेक हिंदीत साकारण्यात आला आहे. त्यामुळे 'कबीर सिंग'च्या वाट्यालाही अपेक्षित यश येईल अशाच चर्चा आहेत.