मुंबई : विविध चित्रपटांच्या निमित्ताने प्रेक्षकांना रुपेरी पडद्यावर बऱ्याच नव्या जोड्या आणि कलाकारांचा सुरेख असा अभिनय पाहायला मिळतो. 'केदारनाथ' या चित्रपटाच्या निमित्तानेसुद्धा अशीच एक नवी जोडी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.
सैफ अली खानची मुलगी सारा अली खान 'केदारनाथ'च्या निमित्ताने चित्रपटविश्वात पदार्पण करत असून, सुशांतसोबतचं तिचं ऑनस्क्रीन नातं सर्वांच्याच मनात घर करत आहे.
याच नात्याची ग्वाही देणारं एक गाणं नुकतच प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. 'काफिराना सा है.....' असे बोल असणाऱ्या या गाण्यात सारा (मुक्कू) आणि सुशांत (मन्सूर) यांच्यात खुलणारं प्रेमाचं नातं अगदी हळूवारपणे उलगडण्यात आलं आहे.
गौरीकुंड ते केदारनाथ धाम या प्रवासादरम्यान 'मुक्कू' आणि 'मन्सूर' कसे एकमेकांच्या प्रेमात पडतात यावर 'काफिराना'तून प्रकाशझोत टाकण्यात आहे. अमित त्रिवेदीने संगीतबद्ध केलेलं हे गाणं अरिजित सिंग आणि निकिता गांधी यांनी गायलं आहे.
गाण्याचे बोल, त्याचं संगीत, पडद्यावर दिसणारे कलाकार, त्यांच्यात खुलणारं प्रेम, या साऱ्यामध्ये एका गोष्टीची जादू पाहायला मिळते. ती गोष्ट म्हणजे निसर्गसौंदर्य. डोंगररांगा, पायवाट, यात्रेचा माहोल आणि त्यातून वाट काढत पुढे जाणारी ही जोडी अशी सुरेख घडी या गाण्याच्या निमित्ताने बसली आहे, असं म्हणायला हरकत नाही.