मुंबई : जागतिक स्तरावर आपल्या अभिनय कलेनं प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेणाऱ्या अभिनेता इरफान खान यांनी काही दिवसांपूर्वीच जगाचा निरोप घेतला. गेल्या दोन वर्षांपासून इरफान न्यूरोएंडोक्राईन ट्यूमर प्रकाराच्या आजाराने ग्रासलेले होते. अतिशय दुर्धर अशा या आजारपणाच्या काळातही जीवनाकडे पाहण्याचा त्यांचा दृष्टीकोन हा बरंच काही शिकवून गेला.
इरफान यांचं जाणं हे फक्त त्यांच्या कुचुंबाच्याच नव्हे, तर त्यांच्या चाहत्यांच्या मनालाही कायमचा चटका लावून गेलं. मुख्य म्हणजे त्यांच्या पत्नीनेही चाहत्यांच्या या अदभूत प्रेमाचा स्वीकार करत त्यांनाही आपल्या या कुटुंबाचाच एक भाग समजलं आहे. आपल्या पतीच्या निधनानंतर इरफान यांच्या पत्नी सुतापा यांनी त्याच्या ट्विटर अकाऊंटवरुन एक पत्र लिहिलं आहे. ज्यामध्ये त्यांनी या आव्हानात्नक काळात आपल्याला साथ देणाऱ्यांपासून ते खुद्द इरफानचेही आभार मानले आहेत.
एक पत्नी, इरफानच्या मुलांची आई आणि यापुढे कुटुंबप्रमुख म्हणून सुतापा यांनी त्यांच्या भावनांना या पत्रावाटे वाट मोकळी करुन दिली. इरफान खान यांनी आयुष्यभरासाठी आपल्याला एका चांगल्या अर्थाने बिघडवलं असंही त्या यात हक्काने म्हणाल्या आहेत.
सुतापा यांच्या पत्रात म्हटलं आहे....
"मी हे कौटुंबीक पत्रक आहे, असं कसं म्हणू जेव्हा सारं जग हे त्यांचं वैयक्तिक नुकसान समजत आहे? मी एकटी पडले असं कसं म्हणू जेव्हा या क्षणी असंख्यजण आमच्यासोबत आहेत? मी सर्वांनाच सांगू इच्छिते ही हे नुकसान नाही. तर, आपल्याचा यातून काहीतरी गवसलंच आहे. गवसलेल्या या गोष्टी म्हणजे इरफान यांनी दिलेली शिकवण. जी आता आपण पूर्णपणे अवलंबात आणू शकतो. तरीही मला त्या गोष्टींची अनुभूती घ्यायची आहे, ज्याविषयी इतरांना माहितीच नाही.
आपल्यासाठी हे अविश्वसनीय आहे, पण मी हे इरफान यांच्याच शब्दांत मांडेन. 'हे जादुई आहे', ते इथे आहेत अथवा नाहीत, त्यांना हेच आवडायचं. विस्तारवादी वास्तविकता त्यांना आवडत नव्हती. त्यांच्याविषयी मी एकच खंत व्यक्त करेन, की त्यांनी मला आयुष्यभरासाठी बिघडवलं. योग्यतेसाठीचा त्यांचा आग्रह मला सर्वसामान्य गोष्टींवर समाधान मानूच देत नव्हता. त्यांना प्रत्येक गोष्टीत एक लयबद्धता दिसायची. अगदी कोलाहलामध्येही.
विदोनी अंगाने सांगावं तर आमचं आयुष्य हा अभिनयाचा एक वर्गच होता. त्यामुळे जेव्हा न बोलवलेल्या पाहुण्यांचा (आजारपणाचा) इथं प्रवेश झाला तेव्हा त्या गोंगाटातही मी त्यांच्याशी संवाद साधणं शिकले. डॉक्टरांचे अहवाल हे एखाद्या संहितेप्रमाणे वाटू लागले. मी त्यातील बारकाव्यांवरभर देऊ लागले''.
From Sutapa, Babil and Ayaan... pic.twitter.com/djfdp5KxTL
— Irrfan (@irrfank) May 1, 2020
सुतापा यांनी या पत्रामध्ये काही डॉक्टरांच्या नावांचाही उल्लेख केला ज्यांनी या काळात इरफान यांच्या कुटुंबाला आधार दिला. त्यांनी पुढे लिहिलं, "हा प्रवास किती सुरेख, दु:खदायी, वेदनादायी, अदभूत आणि उत्साही होता हे सांगणं तसं कठीणच".
आपल्या कुटुंबाची नौका ही मुलं बाबिल आणि अयान यांनी इरफानच्या मार्गदर्शनाने पुढं आणली होती, असंही त्यांनी सांगितलं. "वहाँ नही, यहाँ से मोडो असं सांगणाऱ्या इरफानने मुलांना मार्गदर्शन केलं. पण, शेवटी आयुष्य म्हणजे सिनेमा नाही. इथे काही रिटेकची संधीही नाही. मी मुलांना इतकंच सांगू इच्छिते की वडिलांच्या मार्गदर्शनाने त्यांनी ही नौका पुढे देत वादळांवर मात करावी, असं लिहित कुटुंबाचं चित्रही त्यांनी या पत्रातून सर्वांपुढे ठेवलं.
इरफान यांच्या स्मरणार्थ हा निर्णय....
इरफान यांच्या निधनानंतर अश्रू वाहतीलच, पण त्यांच्या स्मरणार्थ त्यांचं आवडीचं रातराणीचं रोप आम्ही लावणार आहोत. तिथेच, जिथे तुम्ही त्यांना शांततेत विसावण्यासाठी सोडलं आहे. अर्थात त्यासाठी वेळ जाईल. पण, ते नक्की बहरेल, त्याचा सुगंध दरवळेल, आणि त्या सर्वांनाच स्पर्शून जाईल ज्यांना मी चाहते नाही, तर येत्या काळासाठी माझ्या कुटुंबाचा दर्जा देते.... अशा अतिशय भावनिक शब्दांत सुतापा यांनी पत्र आवरतं घेतलं.