मुंबई : सहसा कलाकार हे त्यांच्या कलेमुळे, सौंदर्यामुळं किंवा मग कलाविश्वातील वावरामुळे लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचतात. पण, एक नाव मात्र याला अपवाद ठरत आहे. हे नाव आहे अभिनेत्री साधना शिवदसानी यांचं. हेअरस्टाईलमुळे वेगळी ओळख प्रस्थापित करणाऱ्या आणि लोकप्रियतेच्या परमोच्च शिखरावर पोहोचणाऱ्या साधना यांच्यावर प्रेक्षकांनी भरभरून प्रेम केलं.
वयाच्या पंधराव्या वर्षी साधना यांनी अवघ्या एका रुपयाचं मानधन घेत 'अबाना' या सिंधी चित्रपटात काम केलं होतं. या चित्रपटाचं पोस्टर पाहिल्यानंतर निर्माते सशधर मुखर्जी यांनी साधना यांची भेट घेण्याची इच्छा व्यक्त केली. 'लव इन शिमला' या चित्रपटासाठी ते अशाच अभिनेत्रीच्या शोधात होते. पण, स्क्रीनटेस्टमध्ये मात्र साधना अपयशी ठरल्या.
स्क्रीन टेस्टमध्ये पुढे न जाता येण्याचं कारण होतं साधना यांचं मोठं कपाळ. टेस्टदरम्यान ते व्यवस्थित दिसत नव्हतं. त्यामुळं त्यांना रिजेक्ट करत निर्मात्यांनी ही मुलगी इतक्या मोठ्या कपाळासह हिंदी चित्रपटांमध्ये अभिनेत्री होऊ शकत नाही असं म्हटलं. असं सांगितलं जातं की, या एका घटनेमुळं साधना यांना जबर धक्का बसला.
चित्रपट दिग्दर्शक आर.के. नय्यर या घटनेमुळं जास्त दु:खी झाले होते. त्यांनी दुसऱ्याच दिवशी या मुलीला म्हणजे साधना यांना स्टुडिओमध्ये बोलावलं. हॉलिवूडमध्ये त्या काळी हेअरस्टाईलमुळे प्रसिद्धीझोतात आलेल्या एका अभिनेत्रीविषयी त्यांनी तिला सांगितलं. ही अभिनेत्री होती ऑड्री हेपबर्न.
कपाळावर केसांचा कट असणारी ही हेअरस्टाईल करण्याचा निर्णय साधना यांनी घेतला आणि त्यांचा चेहराच बदलला. दुसऱ्या दिवशी जेव्हा सशधर मुखर्जी यांनी साधना नावाच्या या नवोदित अभिनेत्रीला या नव्या रुपात पाहिलं तेव्हा त्यांना फार आनंद झाला. त्यांनी लगेचच 'लव्ह इन शिमला'साठी साधना यांची निवड केली. हा चित्रपट प्रचंड गाजला आणि साधना हे नाव अनेकांच्याच मनात घर करुन गेलं.
ग्लॅमर आणि स्टाईलच्याच आधारावर साधना यांनी कलाविश्वात अनेक अभिनेत्रींशी स्पर्धा असतानाही आपलं वेगळेपण जपलं होतं. हिंदी चित्रपटसृष्टीत त्यांना मिस्ट्री गर्ल म्हणूनही ओळखलं जाऊ लागलं. 'मेरा साया', 'अनिता' यांसारख्या रहस्यपटांतून त्या झळकल्या होत्या. आपल्या सौंदर्याच्या बाबतीत कमालीच्या सजग असणाऱ्या साधना यांचं जवळपास पाच वर्षांपूर्वी कर्करोगानं निधन झालं. आजच्या घडीला त्या, ७९ वर्षांच्या असत्या.
साधना आज आपल्यात नसल्या तरीही त्यांची ही सुप्रसिद्ध हेअरस्टाईल आणि त्यांनी साकारलेल्या भूमिका या माध्यमातून त्या कायमच प्रेक्षकांच्या स्मरणात राहतील.