बॉक्स ऑफिसवर 'जवान'चं वादळ, 'गदर 2' सह सर्व रेकॉर्ड्सचा पालापाचोळा; फक्त 4 दिवसांत 500 कोटींपेक्षा अधिक कमाई

शाहरुख खानचा चित्रपट 'जवान' सध्या बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई करत आहे. पठाणच्या कमाईसह शाहरुख खानने बॉलिवूडला आश्चर्याचा धक्का दिला होता. पण जवान चित्रपटाने तर अक्षरश: वादळ आणलं आहे. फक्त 4 दिवसात चित्रपटाने कमाईच्या सर्व रेकॉर्ड्सचा पालापोचाळा केला आहे.   

शिवराज यादव | Updated: Sep 11, 2023, 11:51 AM IST
बॉक्स ऑफिसवर 'जवान'चं वादळ, 'गदर 2' सह सर्व रेकॉर्ड्सचा पालापाचोळा; फक्त 4 दिवसांत 500 कोटींपेक्षा अधिक कमाई title=

बॉक्स ऑफिसवर 'जवान' चित्रपटाने वादळ आणलं असून शाहरुख खानने पुन्हा एकदा आपल्याला बॉलिवूडचा बादशाह का म्हणतात हे दाखवून दिलं आहे. जवान चित्रपटाने चित्रपटगृहांना असे दिवस दाखवले आहेत, ज्यांचा कधी त्यांनी विचारही केला नसावा. पहिल्याच दिवशी कमाईचे सर्व रेकॉर्ड्स मोडणाऱ्या जवान चित्रपटाचं वेड चौथ्या दिवशीही कायम आहे. फक्त भारतच नाही तर जगभरात शाहरुख खानची क्रेझ दिसत असून, याचा परिणाम आंतरराष्ट्रीय मार्केटमध्येही दिसत आहे. 

वर्षाच्या सुरुवातीला शाहरुख खानने 'पठाण' चित्रपटातून चार वर्षांनी मोठ्या पडद्यावर जबरदस्त पुनरागमन केलं होतं. या चित्रपटाने कमाईचे असे आकडे बॉलिवूडला दाखवले, जे याआधी कधीही बॉलिवूड चित्रपटांनी पाहिले नव्हते. पण आता जवान चित्रपटाने तर कहर केला असून, बॉलिवूडला कधीही पाहिले नाहीत असे दिवस दाखवले आहेत. 

'जवान' की 'गदर 2'; तीन दिवसांतच झाली पोलखोल; कमाईचे खरे आकडे आले समोर

 

गुरुवारी प्रदर्शित झालेल्या जवाना चित्रपटाने पहिल्या दिवशी रेकॉर्डब्रेक कमाई केल्यानंतर, शुक्रवारी प्रतिसाद थोडासा थंडावला होता. पण शनिवारी चित्रपटाने मोठी झेप घेतली आणि बॉक्स ऑफिसवर वादळ आणलं. रविवारी जवान चित्रपटाने हिंदी चित्रपटसृष्टीला सर्वाधिक कमाईचा दिवस दाखवला. आजपर्यंत कोणत्याही चित्रपटाला ही कामगिरी करता आलेली नाही. 

एकाच दिवसात 80 कोटींची कमाई

ट्रेड रिपोर्ट्सनुसार, रविवारी जवान चित्रपटाने 80 कोटींपेक्षा अधिक कमाई केली आहे. चौथ्या दिवसाची चित्रपटाची एकूण कमाई 80 ते 82 कोटींदरम्यान आहे. कोणत्याही बॉलिवूड चित्रपटाने आजपर्यंत एका दिवसात इतकी कमाई केलेली नाही. फक्त हिंदीत जवान चित्रपटाने रविवारी 70 कोटींपेक्षा अधिकची कमाई केली. रविवारी एका दिवसात सर्वाधिक कमाई करण्याची कामगिरी 'पठाण' आणि 'गदर 2' लाही जमलेली नाही. जवानने सर्व चित्रपटांना मागे टाकलं आहे. 

फक्त 4 दिवसांत देशभरात 250 कोटींपेक्षा अधिकची कमाई

देशात गुरुवारी जवानला 75 कोटींची रेकॉर्डब्रेक ओपनिंग मिळाली होती. शुक्रवारी मात्र चित्रपटाच्या कमाईत थोडी घट दिसली होती. शुक्रवारी चित्रपटाने 53 कोटी कमावले होते. पण शनिवारी चित्रपटाने पुन्हा एकदा झेप घेतली आणि 78 कोटी कमावले. रविवारच्या ऐतिहासिक कमाईनंतर फक्त 4 दिवसांत चित्रपटाने देशात 285 कोटींचा आकडा पार केला आहे. 

याआधी पठाण चित्रपटाने सर्वात वेगाने 250 कोटींचा पल्ला गाठला होता. पठाणने पहिल्या विकेंडला 280 कोटी कमावले होते. तसंच 194 कोटींच्या कमाईसह KGF2 तिसऱ्या क्रमांकावर आहे. 

4 दिवसांत 500 कोटी पार

जवान फक्त देशभरात नाही तर आंततरराष्ट्रीय बाजारपेठेतही जोरदार कमाई करत आहे. फक्त 3 दिवसांत जवानने 300 कोटींचा आकडा पार केला होता. जगभरात चित्रपटाने 384 कोटी कमावले होते. 

भारताबाहेर अनेक देशात अद्याप रविवार संपलेला नाही. शनिवारी जगभरात 140 कोटींची कमाई करणाऱ्या जवानची चौथ्या दिवसाची कमाई 150 कोटींपर्यंत जाण्याची शक्यता ाहे. म्हणजेच चार दिवसात जवानची कमाई 535 कोटींपर्यत जाईल.