मुंबई : साऊथ सुपरस्टार धनुष त्याच्या जीवनशैलीबद्दल कायम चर्चेत राहतो. याच बरोबर तो त्याच्या चित्रपटांमुळेही कायम चर्चेत असतो. मात्र यावेळी तो एका वेगळ्या कारणामुळे चर्चेत आहे. त्याची आलिशान कार धनुषसाठी समस्या बनली आहे. खरं तर, 2015मध्ये, अभिनेत्याने यूकेमधून एक रोल्स रॉयस कार खरेदी केली होती. त्यानंतर त्याने कारला भारतात प्रवेश मिळवण्यासाठी कर सूट मिळावी अशी याचिका दाखल केली.
धनुषला ही याचिका दाखल करणं महागात पडलं आहे आणि आता त्याच्या वकिलांना त्याची याचिका मागे घ्यायची आहे. हे प्रकरण इतके वाढलं आहे की, मद्रास उच्च न्यायालयाने या प्रकरणाची सुनावणी करताना याचिका मागे घेण्यास परवानगी नाकारली आहे.
धनुषला मिळाले 48 तास
दुसरीकडे, 5 ऑगस्ट रोजी झालेल्या या सुनावणीत, धनुषच्या वकिलांनी न्यायालयाला कळवलं आहे की, अभिनेत्याने 50 टक्के कर भरला आहे आणि उर्वरित रक्कम 9 ऑगस्टपर्यंत देण्याचं मान्य केलं आहे. यासोबतच धनुषकडून प्रकरण मागे घेण्याची मागणी करण्यात आली आहे.
न्यायमूर्ती एस.एम. सुब्रमण्यम यांनी एक आदेश मंजूर करताना अर्ज फेटाळून लावला आणि धनुषला रोल्स रॉयस कार प्रवेश कर अर्थात 30.30 लाख रुपये भरण्यासाठी 48 तास दिले आहेत. यासोबतच न्यायमूर्ती म्हणाले की, देशाचा सामान्य माणूस जो साबण विकत घेत आहे, त्याचाही कर भरत आहे. देशातील सर्व नागरिकांनी त्यांची जबाबदारी आणि कायद्याचं पालन केलं पाहिजे.