मुंबई : छोट्या पडद्यावरील वादग्रस्त शो म्हणून बिग बॉसकडे पाहिलं जातं. फक्त हिंदी बिग बॉस नाही तर मराठी बिग बॉसचाही चौथा (Bigg Boss Marathi 4) सिझन सुरु आहे. मराठी बिग बॉसचे सुत्रसंचालन अभिनेता महेश मांजरेकर (Mahesh Manjrekar) करत आहेत. मराठी बिग बॉसचा चौथा सिझन लवकरच प्रदर्शित होणार आहे. या नव्या सीझनमध्ये स्पर्धक म्हणून कोण असणार आहेत हे पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत. दरम्यान, महेश यांनी नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत अभिजीत बिचुकलेंसंदर्भात (Abhijit Bichukale) प्रश्न विचारण्यात आला. यावेळी बिचुकले शोमध्ये सहभागी होत नसल्याची तक्रार महेश मांजरेकरांनी केली. या प्रकरणावर बिचुकलेनं उत्तर दिलं आहे.
'महेश मांजरेकरांना विचारावं लागेल की गेम म्हणजे नेमका कोणता गेम? गेम लावायचा की गेम करायचा? ते जसं मला सांगतील तसा मी गेम खेळू शकतो, पण सर्वांत महत्त्वाचं म्हणजे, आमच्यासारखी हरहुन्नरी माणसं शोधून तिथे नेतात. जे शोधून नेतात ते एंडोमल कंपनीचं काम आहे. एंडोमल कंपनीने मला हिंदीमध्ये लाँच केलं. मला वाटतं, महेश मांजरेकर तिथे पैसे घेऊन नोकरी करतात. त्यामुळे त्यांच्या विधानाला किती महत्त्व द्यायचं', असा खोचक सवाल बिचुकलेनं केला. (mahesh manjrekar abhijit bichukle bigg boss marathi season 4)
बिग बॉसमधल्या निवडीविषयी बिचुकले म्हणाला, 'आता एंडोमल कंपनीनं मला एवढं मोठं केलंय, त्यामुळे जर ती कंपनी मला म्हणाली की साहेब तुम्ही बिग बॉसमध्ये पाहिजे, तर मी विचार करेन. बिग बॉसचा दुसरा सिझन कोणामुळे गाजला? मी किती टीआरपी दिला? मी साताऱ्यात नाव कमावलंय. छत्रपती उदयनराजेंना 20 वर्षांपासून मी विरोध करतोय आणि म्हणून मला नेलं होतं. त्यासाठी अगदी स्ट्राँग मानसिकता लागते. ते लोक तुम्हाला कोंडून ठेवतात म्हणून त्यांना अशाच मानसिकतेचा माणूस पाहिजे.'
'मी बिग बॉस गाजवलं. माझ्यामुळे हा शो घराघरात गेला. याची जाण एंडोमल कंपनीला असेल तर महेश मांजरेकरांच्या कुठल्याही वक्तव्याला ती कंपनी तशी किंमत देणार नाही. भविष्यात कदाचित मी बिग बॉस मराठीचा अँकर असेन', असा विश्वास बिचुकले आहे. त्याचसोबत जर एंडोमल कंपनीनं विचारलं तर हिंदीतही भाग घेईन असं तो पुढे म्हणाला.
बिचुकलेनं फक्त मराठी नाही तर हिंदी बिग बॉसमध्येही सहभाग घेतला होता. त्यावेळी त्याचे अनेकांसोबत खटके उडाले होते. पण तो सीझन चांगलाच चर्चेचा विषय ठरला होता.