मुंबई : काही महिन्यांपूर्वी नवाजुद्दीन सिद्दीकीनं चिंता व्यक्त केली होती की, बॉलिवूडमध्ये चित्रपट हिंदीत बनतात, पण स्क्रिप्ट रोमनमध्ये दिल्या जातात. आता बॉलिवूडमधून हिंदी भाषेचा ट्रेंड कमी होत आहे, असा त्यांचा मुद्दा होता. यावर आता अभिनेता मनोज बाजपेयीही (Manoj Bajpayee) असेच काहीसं म्हणाला आहे. मनोज म्हणाला की, आता फक्त बॉलिवूडमध्येच नाही तर समाजातही हिंदी बोलण्याचा ट्रेंड कमी होत आहे. आता बॉलिवूडमध्ये हिंदी भाषाकडे दुर्लक्ष होत असल्याबद्दल त्यानं दुःख व्यक्त केलं. यामुळे मनोज बाजपेयींनी एक नवीन नियम लागू केला आहे. मनोज फक्त देवनागरी लिपीतल्या स्क्रिप्ट वाचतो.
काही काळापूर्वी बॉक्स ऑफिसवर बॉलिवूड आणि साऊथच्या चित्रपटांच्या यशावरून नकळत युद्ध सुरु झालं. या वादावर दोन्ही चित्रपटसृष्टीतील लोकांनी त्यांच मत मांडलं. किचा सुदीप यांनी हिंदीला राष्ट्रभाषा न ठरवून नव्या वादाला तोंड फोडलं होते. त्यानंतर या प्रकरणावर बराच वेळ वाद सुरू होता. पण हा मुद्दा चित्रपटांतील चांगल्या आशय आणि दर्जावरून हिंदी भाषेकडे कधी सरकला, हे कळलंच नाही. बॉलिवूडमध्ये वर्षानुवर्षे सुरू असलेल्या यशाच्या मापदंडांवरही चर्चा सुरू झाली. पण आता बॉलिवूडमधून हिंदी भाषा नाहिसी होत आहे हे क्वचितच कोणाच्या लक्षात आले असेल. (Manoj Bajpayee Reacts On Hindi Being Sidelined In Bollywood Says He Refuses To Read Scripts Which Are Not In Devanagri)
नुकत्याच एका पुस्तक प्रकाशन कार्यक्रमात मनोजनं हजेरी लावली होती. तेव्हा त्याला इंग्रजी भाषेच्या ट्रेंडबद्दल प्रश्न विचारण्यात आला. तो म्हणाला, 'यामध्ये केवळ मनोरंजनसृष्टीचा दोष नाही. त्यापेक्षा आपण सगळ्यांनाच आपल्या मुलांना इंग्रजी माध्यमाच्या शाळेत पाठवायला आवडतं, मग ते चांगलं की वाईट. आमच्या मुलांनी सगळ्यात आधी इंग्रजी बोलायला शिकावं अशी आमची इच्छा आहे आणि मग जर तुमच्याकडे वेळ आणि शक्ती शिल्लक असेल तर दुसरी भाषा शिका. त्यामुळे पालक म्हणून आपण नापास आहोत. शिक्षक म्हणून आपण नापास आहोत. याचं कारण म्हणजे आपल्याला आपल्या भाषेचं महत्त्व कळत नाही आणि आपल्या मुलांना ती शिकवता येत नाही.
पुढे मनोज बाजपेयी बॉलिवूडमध्ये इंग्रजी भाषेच्या वाढत्या ट्रेंडबद्दलही बोलत म्हणाला, ते अत्यंत दुःखद आहे. मनोरंजन उद्योगही या बाबतीत आपल्या समाजापेक्षा वेगळा नाही. आजकाल इंडस्ट्रीमध्ये 90 ते 95 टक्के नवोदित फक्त इंग्रजीतच लिहितात. हे अतिशय दुःखद आहे. पण मी फक्त देवनागरीतील लिपी वाचतो. देवनागरी लिपीत स्क्रिप्ट असावी अशी मागणी खूप कमी लोक करतात. देवनागरी लिपीत नसलेली कोणतीही स्क्रिप्ट वाजत नाही.'
मनोज बाजपेयी पुढे म्हणाले, 'जर स्क्रिप्ट इंग्रजीत लिहिलेली असेल तर मी ती परत करतो. मला इंग्रजी येत नाही असे नाही. मला ही भाषा अवगत आहे. पण आपण कलाकार आहोत जो सगळ्या गोष्टी व्यक्त करतो आणि पडद्यावर हिंदी भाषेत व्यक्त व्हावं लागतं. यामुळे आपली भाषा लिहिण्याची, वाचण्याची आणि बोलण्याची समज सुधारेल. यामुळे स्क्रिप्ट फक्त हिंदीतच वाचायला हवी.
मनोजच्या कामाविषयी बोलायचं झालं तर तो लवकरच 'सूप' या वेबसिरीजमध्ये दिसणार आहे. याशिवाय त्याच्याकडे 'डिस्पॅच', 'जोरम' आणि 'गुलमोहर' हे तीन चित्रपट आहेत.