'....म्हणून मराठी भाषिक कलाकारांना फारशी चांगली वागणूक नाही'

सुबोध भावेची खंत

Updated: Oct 25, 2019, 07:04 PM IST
'....म्हणून मराठी भाषिक कलाकारांना फारशी चांगली वागणूक नाही' title=
'....म्हणून मराठी भाषिक कलाकारांना फारशी चांगली वागणूक नाही'

मुंबई : मराठी भाषा आणि या भाषेच्या संवर्धनासाठी आजवर बऱ्याच कालाकारांनी आणि दिग्गजांनी पुढाकार घेतला आहे. असं असलं तरीही प्रत्येक वेळी एखादा चित्रपट प्रदर्शित झाला किंवा एखादं नाटक प्रेक्षकांच्या भेटीला आल्यावर मात्र त्याला एक ठराविक वर्ग वगळता नाट्यगृह किंवा सिनेमागृहात जाऊन पाहणारा वर्ग हा फार मोठा नाही. हिंदी किंवा इतर भाषिक कलाविश्वात असं चित्र तुलनेने कमीच पाहायला मिळत असावं.फक्त कलाविश्वच नव्हे, तर एकंदरच मराठी भाषा आणि मराठी भाषिकांविषयी वस्तूस्थिती नेमकी काय आहे, याचं चित्र आणखी स्पष्ट करत त्यामागची काही कारणं अभिनेता सुबोध भावे याने मांडली. 

सोशल मीडियाच्या माध्यमातून त्याने काही महत्त्वाचे विचारही मांडलेय 'मराठी चित्रपटांची जी अवस्था आहे तशीच भयंकर अवस्था ही मराठी नाटकांची आणि त्याहूनही मराठी भाषेची आहे', असं म्हणत किमान मराठी बोलता न येणं, त्यातून व्यक्त न होता येणं ही बाब अत्यंत भयंकर असल्याची खंत सुबोधने फेबुकवर पोस्ट केलेल्या व्हिडिओतून व्यक्त केली. 

मराठी न येणं, मराठी न वाचणं, विचार व्यक्त न करता येणं या गोष्टींवरही त्याने कटाक्ष टाकला. सातत्याने मराठी भाषेच्या संवर्धनासाठी कार्यरत असणाऱ्यांच्या कामाची प्रशंसा करत अशा कामांना, कार्यक्रमांना आणि अशा व्यक्तींना आपण प्रोत्साहन दिलं पाहिजे हा सूर सुबोधने आळवला. 

आपल्या एका परदेशी दौऱ्याचा उल्लेख करत त्याने परदेशामध्ये मराठी भाषिक कलाकारांकडे कसं पाहिलं जातं हे स्पष्ट केलं. मराठी भाषिक कलाकारांप्रती असणारी इतरांची वागणूक फारशी चांगली नसते असं म्हणत यामागे या कलाविश्वात पैसा नाही, असं सुबोध भावे म्हणाला. 'ज्या भाषेतील लोकांकडे व्यवसाय असतो ती भाषा खऱ्या अर्थाने श्रीमंत होत असते', असं म्हणत त्याने तरुण- तरुणींना व्यवसाय क्षेत्रात उतरण्याचा सल्ला दिला आहे. अशी मंडळी त्यांच्या क्षेत्रात जेव्हा मोठी होतात तेव्हा त्यांच्यासोबत भाषा आणि प्रांतही मोठा होत असतो हे त्याने स्पष्ट केलं. 

महाराष्ट्राला लाभलेल्या संत परंपरेपासून छत्रपती शिवाजी महाराजांच्या परंपरेला मानाचा मुजरा करत मराठी वीरांचं कार्यही त्याने पुन्हा एकदा सर्वांच्या स्मरणात आणून दिलं. चित्रपट, मराठी भाषा, साहित्य आणि मराठी व्यक्ती टीकली पाहिजे आणि ती मोठी झाली पाहिजे असा निश्चयी सूर आळवत त्याने सर्वांना एकत्र येण्याची विनंती केली आहे. 

'बाहुबली' या दाक्षिणात्य चित्रपटाचा संदर्भ देत ज्याप्रमाणे या चित्रपटाने साऱ्या जगामध्ये एक वेगळाच दबदबा निर्माण केला, त्याचप्रमाणे मराठी भाषेतही अशाच प्रकारचा चित्रपट साकारला जावा असं म्हणत या चित्रपटातून छत्रपतींच्या गाथेचं दर्शन घडावं असा आशावाद व्यक्त केला. या चित्रपटाच्या कमाईपेक्षा त्याने भारतभ्रमण करावं असंही सुबोध म्हणाला.