नुकताच 57 वा महाराष्ट्र राज्य चित्रपट पुरस्कार सोहळा संपन्न झाला. या पुरस्कार सोहळ्यात अनेक कलाकारांचा गौरव करण्यात आला. या पुरस्कार सोहळ्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार हे उपस्थित होते. या पुरस्कार सोहळ्यावेळी ज्येष्ठ मराठी अभिनेते अशोक सराफ यांना ‘महाराष्ट्र भूषण पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. याच पुरस्कार सोहळ्यादरम्यान प्रसिद्ध मराठी अभिनेत्री मृण्मयी देशपांडेला एक पुरस्कार मिळाला आहे.
‘अग्निहोत्र’, ‘कुंकू’ या मालिकांमुळे अभिनेत्री मृण्मयी देशपांडे घराघरांत लोकप्रिय झाली. मालिका, चित्रपट, वेबसीरिज अशा तिन्ही माध्यमांमध्ये तिने आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे. मृण्मयी ही सोशल मीडियावर सक्रीय असते. आता मृण्मयीने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. तिच्या या पोस्टने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे. मृण्मयी देशापांडेच्या ‘मिस यू मिस्टर’ या चित्रपटाला कै.स्मिता पाटील पुरस्कार’ मिळाला. या पुरस्कारानिमित्त तिने एक पोस्ट शेअर केली आहे.
मृण्मयीने इन्स्टाग्रामवर पुरस्काराचे स्मृतीचिन्हाचे काही फोटो पोस्ट केले आहेत. या फोटोला कॅप्शन देताना तिने तिच्या भावना व्यक्त केल्या आहेत. “काल आमच्या ‘miss you mister’ या फिल्मसाठी महाराष्ट्र शासनाचा (state award) – ‘कै. स्मिता पाटील पुरस्कार’(best actress in film category) मिळाला… समीर जोशी याचं सगळं श्रेय तुला जातं…(दिग्दर्शनाचं द्वितीय पारितोषिक मिळालं त्याबद्दल पण खूप प्रेम आणि अभिनंदन ) अजूनही ही फिल्म कुठे बघता येईल असे messgaes सतत येतात… @deepatracy तुमचे सुद्धा मनापासून आभार … काल सोहळ्याला हजेरी नाही लावता आली. त्यामुळे miss you all म्हणावं लागत आहे. पण आता लवकर भेटूया.” असे मृण्मयी देशपांडेने म्हटले आहे.
तिच्या या पोस्टवर अनेक कलाकर कमेंट करत आहेत. अभिनेता सिद्धार्थ चांदेकरने मुन्नी अशी कमेंट केली आहे. तर नम्रता संभेराव, स्वानंदी टिकेकर यांनी तिला शुभेच्छा दिल्या आहेत. त्यासोबतच अनेक चाहत्यांनी तिच्या पोस्टवर कमेंट केल्या आहेत. यावर एकाने Congratulations.. खरेच कुठे बघता येईल.. थिएटरला असताना खरं राहून गेली आहे.. आणि मन फकिरा सुद्धा..दोन्ही नाही सापडत कुठे online.., असा प्रश्न विचारला आहे. त्यावर तिने मन फकिरा जिओ सिनेमावर आहे, असे म्हटले आहे.
दरम्यान मृण्मयी ही सध्या 'मुंबई डायरीज' या वेबसीरिजच्या दुसऱ्या भागात झळकली होती. ही वेबसीरिज 6 ऑक्टोबर 2023 अॅमेझॉन प्राईमवर प्रदर्शित करण्यात आली होती. २६/११ च्या हल्ल्याच्या दिवशी डॉक्टर कोणत्या परिस्थितीत होते याचे उत्कृष्टरित्या वर्णन करण्यात आले आहे. दिग्दर्शक निखिल आडवाणीने याचे दिग्दर्शन केले आहे. या सीरिजमध्ये मृण्मयी देशपांडेबरोबर मोहित रैना, कोंकणा सेन शर्मा, श्रेया धन्वंतरी, सत्याजीत दुबे आणि नताशा भारद्वाज प्रमुख भूमिकेत झळकले आहेत.