Zee Marathi Award 2024 : यंदाचा ‘झी मराठी अवॉर्ड 2024’ खऱ्या अर्थानं संस्मरणीय असणार आहे, कारण झी मराठी यंदा 25 वर्ष पूर्ण करत आहे. या कार्यक्रमात धमाकेदार परफॉर्मन्स असणार आहेत. त्यासोबत हृदयस्पर्शी आठवणींचा देखील समावेश असणार आहे. कार्यक्रम ऐन रंगात असताना घोषणा झाली ती एका अश्या पुरस्काराची ज्यानं उपस्थित कलाकारांचे डोळे पाणावले. हा सन्मान कोणा व्यक्तीचा नसून तो होता एका अशा मालिकेचा ज्या मालिकेनं प्रत्येक घरा-घरात मराठी मालिकांचं एक स्थान निर्माण केलं.
आता तुम्हालाही प्रश्न पडला असेल की ही मालिका कोणती तर ही तिच मालिका आहे जिच्या कलाकरांच्या आणि तंत्रज्ञांच्या यादीवर नजर टाकली तरी त्या मालिकेची श्रीमंती कळते. रात्री 8 वाजले रे वाजले की ऐकू यावा असं या मालीकेचं शीर्षक गीत, हे सगळ्याच घरातून ऐकायला यायचं. त्या काळात फक्त हिंदी मालिकाच सगळ्यात जास्त पाहिल्या जायच्या त्याच वेळी ज्या मराठी मालिकेनं सगळ्यांच्या मनावर राज्य केलंं, त्या मालिकेचं नाव 'आभाळमाया' आहे. तर 'आभाळमाया' या मालिकेशिवाय हा कार्यक्रम किंवा रौप्य महोत्सवाचा सोहळा पूर्ण होऊच शकत नाही.
मराठी खाजगी वाहिनीवरील पहिली मालिका म्हणजेच आपल्या सगळ्यांची आवडती 'आभाळमाया'. मराठी मालिका विश्वाच्या इतिहासातलं सोनेरी पान.. झी मराठी प्रमाणेच 'आभाळमाया' मालिकेलाही पंचवीस वर्ष पूर्ण झाली आहेत. या सोहळ्या दरम्यान, या मालिकेची संपूर्ण टीम अर्थात सुकन्या कुलकर्णी, मनोज जोशी, सुबोध भावे, मुक्ता बर्वे, हर्षदा खानविलकर, मनवा नाईक, संजय मोने, उदय सबनीस, अरुण नलावडे, उमेश कामत, सोनाली खरे, राहुल मेहेंदळे, वैजयंती आपटे, मुक्ता बर्वे, प्रिया बापट, लेखक विवेक आपटे, दिग्दर्शक मंदार देवस्थळी, निर्माते अच्युत वाझे आणि सुबोध गाडगीळ मंचावर उपस्थित होते.
हा पुरस्कार घेताना सुकन्या ताईंनी विनय आपटे सर आणि शुभांगी जोशी यांच्याशी असलेल्या नाते संबंधांना उजाळा दिला. मालिकेच शूटिंग म्हटलं की किस्से नाहीत असं होतच नाही. संजय मोने यांनी किस्से सांगायला सुरुवात केल्यावर संपूर्ण सभागृहात एकच हश्या पिकली. यासोबतच सुबोध भावे, विवेक आपटे, मंदार देवस्थळी, मुक्ता बर्वे, यांनी देखील जुन्या आठवणींना उजाळा दिला.
'आभाळमाया' ही मालिका म्हणजे मैलाचा दगड आहे. या मालिकेनं आपल्या सगळ्यांना प्रेरित केलं आहे. या रौप्य सोहळ्याचे निवेदक संकर्षण आणि मृण्मयी यांनी सर्व कलाकारांसोबत सेल्फी घेत, या जुन्या आठवणींना कॅमेरात कैद केलं. त्यामुळे आता तुम्ही हे अविस्मरणीय सोहळा विसरू नका कारण हा खास सोहळा फक्त एक दिवस नाही तर दोन दिवसांचा असणार आहे. 26 आणि 27 ऑक्टोबरला संध्याकाळी 7 वाजता तुम्ही हा कार्यक्रम झी मराठीवर पाहू शकतात.