मुंबई : सोनी टीव्हीचा 'इंडियन आयडॉल 12' हा कार्यक्रम सतत काहीना काही कारणामुळे सतत वादाच्या भोवऱ्यात अडकतो. प्रेक्षकांकडून या कार्यक्रमावर मोठा आक्षेप घेतला जात आहे. असं असताना आता सूत्रसंचालक, गायक आदित्य नारायण वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. मनसेचे चित्रपट सेना अध्यक्ष अमेय खोपकर यांनी चांगलाच समाचार घेतला आहे.
इंडियन आयडलमध्ये एका स्पर्धकाशी बोलताना आदित्य नारायण (Aditya Narayan) याने ‘राग पट्टी ठीकसे दिया करो, हम अलिबागसे आये है क्या’ असे म्हटले होते. यावर आता समस्त अलिबागकरांनी आक्षेप घेत मनसेचे चित्रपट सेना अध्यक्ष अमेय खोपकर (Amey Khopkar) यांच्याकडे तक्रारीदेखील केल्या आहेत.
अमेय खोपकर यांनी देखील आदित्य नारायण याच्या या वक्तव्यावर चांगलीच कान उघडणी केली आहे. इतकेच नव्हे तर त्यांनी आदित्यला आपल्या फेसबुक लाईव्ह सेशनमधून कडक शब्दांत त्याला समज देखील दिली आहे. ‘आम्ही आता या हिंदीवाल्यांसाठी एक पत्रकच काढणार आहोत. पुन्हा ‘हम अलिबागसे आये है क्या’ असे वाक्य ऐकू येऊ नये. पुन्हा असं झालं तर यावेळी पत्रक नाही काढणार, फेसबुक लाईव्ह नाही करणार, सरळ कानाखाली आवाज काढणार. ही वेळ आता शुटींग बंद करण्याची नाही, त्यामुळे फेसबुक लाईव्हमधून समाज दिली आहे. मात्र, त्यांना माफी ही मागावीच लागेल. मी माझ्यापरीने जे शक्य ते करेनच. आम्ही महाराष्ट्राच्या कुठल्याही भागाचा अपमान सहन करणार नाही! आदित्य नारायणला अलिबागकरांची माफी मागायला लावणारच!’ अशा कडक शब्दांत त्यांनी आपला संताप व्यक्त केला आहे.यानंतर आदित्य नारायणने जाहीर सगळ्यांची माफी मागितली आहे.
आदित्य आपल्या व्हिडिओत सांगतोय की,'माझ्याकडून ही अनावधानाने चूक झाली. अलिबाग आणि अलिबागकरांचं मन दुःखावण्याचा हेतू नव्हता. पण कुणाला वाईट वाटलं असेल तर मी माफी मागतो.'