Nargis Fakhri : बॉलिवूड अभिनेत्री नर्गिस फाखरी ही तिच्या रॉकस्टार या चित्रपटासाठी ओळखली जाते. या चित्रपटात नर्गिस रणबीर कपूरसोबत स्क्रिन शेअर करताना दिसली. दरम्यान, नर्गिसनं आजवर काही ठरावीक चित्रपटांमध्ये काम केलं असलं तरी देखील तिच्या चाहत्यांची यादी कमी नाही. नर्गिस ही सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे पाहायला मिळते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत ती चाहत्यांच्या संपर्कात राहते. नर्गिसनं तिचं लहाणपण हे अमेरिका, युरोप आणि साउथ इस्ट एशिया इतक्या ठिकाणी काढलं. त्यानंतर अभिनय क्षेत्रात करिअर करण्यासाठी नर्गिस ही मुंबईत आली. करिअरच्या सुरुवातीच्या काळात ती मुंबईत कुठे राहिली आणि त्यावेळी तिला आलेला भूताटकिचा अनुभव नर्गिसनं सांगितला आहे. कशा प्रकारे ती एका स्मशानभूमी जवळ असलेल्या घरात राहू लागली आणि तिला भयानक अनूभव येऊ लागले.
करिअरच्या सुरुवातीला नर्गिस भाड्याच्या घरात राहत होती. तर त्यानंतर काही दिवसांनी तिने स्वतःच घर घेतलं आणि ती तिथे शिफ्ट झाली. पण या तिच्या स्वतःच्या नवीन घरात आल्यावर तिला कसे अनेक विचित्र अनुभव आले. याविषयी नर्गिसनं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत सांगितले आहे. नर्गिस म्हणाली की, 'मी जेव्हा मुंबईत स्वतःच घर घेतलं तेव्हा मला खूप आनंद झाला होता. कारण ते माझं हक्काचं आणि मेहनतीचं घर होतं. हे घर मी हिल रोड परिसरात घेतल असून ते स्मशानभूमीच्या जवळ होतं. त्या घरात राहत असताना मला अनेक विचित्र स्वप्न पडायची आणि अचानक रात्री अपरात्री झोपेतून जाग यायची. यावेळी येणारी स्वप्न ही खूप भयानक आणि भीती वाटेल अशी होती. या स्वप्नात एका सहा फूट उंच पांढरे कपडे परिधान केलेला भूतासारखा माणून मला स्मशानभूमीकडे घेऊन जातो. स्मशानात गेल्यानंतर तिथे तो हातानं खणायचा आणि मातीतून माणसांची हाडे बाहेर काढायचा. इतकंच नाही तर तो त्यांचं मांस खायचा आणि मलाही खायला सांगायचा. हे स्वप्न मला सलग चार दिवस रात्री आलं.' तर या स्वप्नातून ती बरोबर तीनच्या ठोक्याला उठायची असं देखील तिनं सांगितलं.
पुढे नर्गिस म्हणाली, 'हे सगळं पाहता मी खूप घाबरे आणि त्यानंतर मी लगेच दिल्लीला निघून गेले. त्यानंतर मी माझ्या टीमला माझं संपूर्ण सामान आणायला सांगितलं. पण जेव्हा ते लोक मुंबईत माझ्या घरात सामान पॅक करायला आले तेव्हा त्यांनी मला सांगितलं की माझ्या घरात सहा पक्षी मरून पडलेले होते. हे खुप विचित्र होतं. माझ्या घरात काय सुरु आहे याची मला कल्पना नव्हती.' हा सगळा अनुभव सांगत असताना नर्गिसनं सांगितलं की तिला कोणत्याही अंधश्रद्धेसारख्या गोष्टीला पाठिंबा द्यायचा नाही आहे. ती फक्त तिला आलेले अनुभव सांगते.