मुंबई : 'देशभक्ती ही मेरी शक्ती हैं' अशा टॅग लाइनखली 'पीएम नरेंद्र मोदी' सिनेमाचा दुसरा पोस्टर प्रदर्शित करण्यात आला. सिनेमाच्या टीमने या पोस्टरच्या माध्यामातून देशवासियांना एकतेचा संदेश दिला आहे. वैविधतेने नटलेल्या भारत देशात अनेक जाती धर्मांचे लोक वास्तव्यास आहेत. भारतात वेगवेगळ्या राज्यात वेगवेगळ्या संस्कृतीचे जतन केले जाते. त्याच प्रमाणे कला, संगीत क्षेत्रातही लोकनृत्य आणि लोकगीते प्रसिद्ध आहेत. म्हणजे लोकांनी लोकांसाठी लोकांकरीता उदयास आणलेले संगीत किंवा नृत्य. सिनेमातील नव्या पोस्टरच्या माध्यामातून याची प्रचिती येत आहे.
बहुप्रतिक्षीत 'पीएम नरेंद्र मोदी' सिनेमाच्या तारखेत बदल करण्यात आला आहे. सिनेमा एप्रिल महिन्याच्या १२ तारखेला सिनेमागृहात दाखल होणार होता. पण चाहत्यांची प्रतिक्षा आता कमी होणार आहे. तर 'पीएम नरेंद्र मोदी' सिनेमा ५ एप्रिल रोजी सिनेमागृहात दाखल होणार आहे. ट्रेड अॅनलिस्ट तरण आदर्श यांनी सिनेमाचे दुसरे पोस्टर आणि सिनेमा प्रदर्शनाचा तारखेत झालेला बदल स्वत:च्या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन चाहत्यांना कळवला आहे.
प्रदर्शित केलेल्या पोस्टरमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भोवती वैविधतेने नटलेली बच्चे कंपनी दिसत आहे. या पोस्टरमध्ये झेंड्याचे तीन रंग दिसत आहेत. सिनेमात अभिनेता विवेक ऑबेरॉय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची व्यक्तिरेखा साकारणार आहेत. सिनेमात दर्शन कुमार, बोमन ईरानी, जरीना वहाब, मनोज जोशी, प्रशांत नारायण, बरखा बिष्ट सेनगुप्ता, अक्षत आर सलूजा, अंजन श्रीवास्तव, राजेंद्र गुप्ता आणि यतिन कर्येकर यांसारखे दिग्गज कलाकार मोठ्या पद्यावर दिसणार आहेत. सिनेमा विवेक ऑबेरॉय आणि ओमंग कुमार यांच्या दिग्दर्शनाखाली तयार होत आहे.